मी हाडाचा शिवसैनिक, धमकी नव्हे, अ‍ॅक्शन घेतो; राऊतांचा पुन्हा रनौतला इशारा

Kangana Ranaut-Sanjay Raut

मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरून (Sushant Singh Rajput death) अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील वाद आणखीनच चिघळला आहे. मुंबई सुरक्षित वाटत नाही, मुंबई पाक व्याप्त काश्मीरसारखी वाटते असे कंगनाने म्हटले होते. यावरून संजय राऊत यांनी कंगना रानौतसह भाजपच्या नेत्यांनाही खडे बोल सुनावले आहे.

ही बातमी पण वाचा:- पुण्याच्या लॉकडाऊनवरुन संजय राऊतांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला

यावेळी संजय राऊत म्हणाले की, मुंबई पोलीस मुंबई शहराचं सातत्याने रक्षण करत आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना मुंबईत राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी. आज कोरोनाच्या संकटकाळातही मुंबई पोलीस शहराचे रक्षण करत आहे.

ही मुंबई १०६ हुतात्मांनी मिळवली आहे. या मुंबईचं रक्षण आमच्या पोलिसांनी केलं आहे. २६/११ हल्ला मुंबई पोलिसांनी परतवला, कसाबला याच पोलिसांनी पकडलं, अशा या मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी. मी पोकळ धमक्या देत नाही, मी हाडाचा शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत. महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का? त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनावर हल्लाबोल केला.

मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्यांना पाठीशी घालणारे जे कोणी आहेत, त्यांना मुंबईत मतं मागताना लाज वाटली पाहिजे, तुम्हाला पीओके ने मतं दिली का? असा सवाल करत अश्याना मुंबईत मते मागण्याचा अधिकार राहिलेला नाही. राम कदमांनी कंगना रनौतची तुलना झाशीच्या राणीशी करणं हा सर्वात मोठा अपमान आहे, झाशीची राणी ही महाराष्ट्राची वीरकन्या, महाराष्ट्राच्या अस्मितेवर गुळण्या टाकणाऱ्या कोणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल, आणि राजकीय पक्ष झाशीच्या राणीचा अपमान करणार असेल, तर राजकारण किती तळाला नेलंय हे स्पष्ट दिसतं, असेही संजय राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER