
नवी दिल्ली : राम मंदिर आंदोलनात सक्रिय भाग घेणारी शिवसेना आता राम मंदिरनिर्मितीबाबत वेगळी भूमिका घेताना दिसत आहे. अलीकडेच अयोध्येत सापडलेल्या राम मंदिराच्या अवशेषांबाबत शिवसेनेने म्हटले आहे की, राम मंदिरासारख्या मुद्द्यांकडे आता पाहण्याची वेळ नाही तर कोरोना विषाणूशी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका इंग्रजी वाहिनीशी संवाद साधताना सांगितले की, ही वेळ मंदिर आणि भारत-पाकिस्तानसारख्या मुद्द्यांचा विचार करण्याची नाही. ते म्हणाले की, आमचे संपूर्ण लक्ष कोरोना विषाणूंविरुद्ध लढण्यावर आहे. मंदिराचे अवशेष बघण्यासाठी बाकीचे लोक आहेत. ते बघतील. सध्या राम मंदिर आणि भारत पाकिस्तान यासारखे मुद्दे वेगळे ठेवले पाहिजेत. राऊत म्हणाले की, सध्या देशासमोर सर्वांत मोठे संकट म्हणजे कोरोना विषाणू आहे आणि म्हणूनच आपण यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे काही दिवस बंद राहिल्यानंतर अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम पुन्हा सुरू झाले आहे. राम मंदिरासाठी जागेचे सपाटीकरण करण्यासाठी खोदकाम केले जात आहे. या दरम्यान बुधवारी येथे अनेक अवशेष सापडले आहेत, ज्यावरून या ठिकाणी प्रथम मंदिर असल्याचे दिसून येते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला