
मुंबई :- औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतरावरून राज्यातील राजकारण सध्या भलतेच गरम झाले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील विशेषतः कॉंग्रेसनेत्यांची नाराजी आजवरी झाकून नेणारे कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पहिल्यांदाच औरंगाबादच्या नामांतरावरून सेनेच्या विरुद्ध आवाज उठवला आहे. औरंगाबादचे नामांतर करण्यासाठी कॉंग्रेसचा विरोध असणार असे म्हणून थोरात यांनी खळबळ उडवून दिली आहे.
त्यानंतर पुढे या वादाला शमविण्यासाठी कॉंग्रेसचा नेमका विरोध कशासाठी, संभाजी महाराजांच्या नावाला त्यांचा विरोध का असा प्रश्न करून या वादाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला मात्र, थोरातांनंतर कॉंग्रेसमधील इतर नेत्यांनीही या नामांतरावरून सेनेच्या विरोधात आवाज उठवला आहे. याच संधीचा फायदा घेत विरोधकांनीही सेनेला कोंडीत पकडण्याचा सुरूवात केली आहे.
मात्र, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधताना औरंगाबादच्या नामांतराविषयीची शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.
औरंगाबादच्या नामांतराविषयीची शिवसेनेची भूमिका सर्वांना माहीत आहे. ३० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं केलं आहे. त्यामुळे त्यावर आता फक्त सही शिक्का उमटायचा आहे, असं संजय राऊत यांनी सांगितले.
महाविकास आघाडीमध्ये (Mahavaikas Aghadi) नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत- राऊत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी “महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत, असं सांगितलं आहे. बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण किंवा अन्य कोणी महाराष्ट्रातील नेते आहेत त्यांचं औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी राजे यांच्यावरच प्रेम आणि श्रद्धा आहे. प्रत्येक व्यक्तीची, हिंदूंची छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असायला हवी. जसा बाबर आमचा कोणी लागत नाही तसा औरंगजेबही लागत नाही. दिल्लीतील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राम मंदिर उभारण्याची परवानगी दिली आहे. कारण, या भूमीचं जसं बाबरशी नातं नाही तसंच औरंगजेबाशीही नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते एकत्र बसून यासंदर्भात चर्चा करुन निर्णय घेतील, असेही संजय राऊत यांनी सांगितलं.
काँग्रेसची भूमिका स्पष्ट महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे.
आता संजय राऊतांच्या या ताज्या विधानानंतर कॉंग्रेसचे नेते किंवा विरोधक काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे असेल.
ही बातमी पण वाचा : चंद्रकांतदादांचे पत्रलेखन म्हणजे उकळत्या किटलीतील रटरटता चहा ; संजय राऊतांचा टोला
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला