Phone Tap Case : संजय राऊतांचा इशारा खरा ठरणार; विरोधकांवरच बुमरँग होणार?

मुंबई : मंत्र्यांचे फोन टॅपकरून (Phone Tap Case) मिळालेल्या माहितीच्याआधारे भाजपने ठाकरे सरकारवर आरोप करायला सुरुवात केली आहे. भाजपच्या या आक्रमकतेला वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते डॅमेज कंट्रोलसाठी पुढे आले आहेत. फोन टॅपिंग प्रकरणाचा सूत्रधार असलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाईची तयारी ठाकरे सरकारने सुरू केल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. आता हे प्रकरण विरोधकांवरच बुमरँग होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

रश्मी शुक्ला या राज्य गुप्त विभागाच्या तत्कालीन आयुक्त असताना, कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना त्यांनी काही राजकीय व्यक्तींचे, सनदी अधिकाऱ्यांचे, तसेच काही पत्रकारांचेही फोन टॅप केले होते काय? याचा शोध आता सरकार घेणार आहे. हे संपूर्ण प्रकरण घडले तेव्हा सीताराम कुंटे हे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. यामुळे त्यांचा अहवाल महाविकास आघाडीसाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांनी दिलेला इशारा

“केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी ढगातून खाली पडलेत का? आमच्या अधिकाऱ्यांना तपास करता येत नाही का? केंद्र सरकारने महाराष्ट्रात ईडी किंवा कोणतीही यंत्रणा आणून तपास केला, तरी आम्हाला फरक पडत नाही. महाविकास आघाडी सरकार हे भक्कम आहे. विरोधी पक्ष परमबीर सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन स्वत:ला खूप हुशार समजत आहे. मात्र, हे प्रकरण त्यांच्यावर बुमरँग होईल.” असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता.

पोलीस बदल्यांचा रेकॉर्ड तपासणार?

फडणवीस सरकारने ५ वर्षाच्या कालावधीत राजकीय शिफारशीमुळे झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी गृह मंत्रालय आणि पोलीस मुख्यालयाला दिल्याचे समजते. ठाकरे यांनी बैठक घेत फडणवीस सरकारच्या काळात बदल्यांचा तपशील आणि शिफारस पत्रे देण्याचे आदेश दिले. ही माहिती सार्वजनिक करण्यात येईल. यांपैकी काही पत्रे मंत्रालयात, तर काही पत्रे पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कुंटे पत्रकारपरिषद घेण्याची शक्यता

रश्मी शुक्ला यांनी परवानगीविना ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे फोन टॅपिंग केले. सीताराम कुंटे हे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत असताना फोन टॅपिंगची परवानगी दिली असल्याचे रश्मी शुक्ला यांनी सांगितले. २ महिन्यांपूर्वी सीताराम कुंटे यांच्या परवानगीविना फोन टॅप केल्याचे समजते आहे. त्यामुळे या फोन टॅपिंग प्रकरणात कुंटे यांची भूमिका संशयास्पद आहे. या प्रकरणावर कुंटे यांनी अद्याप मौन धारण केले आहे.

सीताराम कुंटे आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा खुलासा करणार असल्याची शक्यता आहे. फोन टॅपिंग करण्यात आले, त्यावेळी कुंटे हे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी कार्यरत होते. तेव्हा रश्मी शुक्ला या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी कार्यरत होत्या. रश्मी शुक्ला या अनधिकृत फोन टॅप करत होत्या म्हणून त्यांची बदली करण्यात आली होती.

‘अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, आता लढायला पाहिजे’

बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री यांनी फोन टॅपिंगच्या विषयावर संताप व्यक्त केला. “आपण अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो. अशाप्रकारे फोन टॅप होत राहिले तर अधिकाऱ्यांवर विश्वास तरी कसा ठेवायचा. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप खोडून काढायला हवेत. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढले पाहिजे.” असे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER