सीबीआय म्हणजे … मोदी-शहांचे तेव्हाचे मत सुशांत प्रकरणात व्यक्त झाले तर काय चुकले?- संजय राऊत

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या (Sushant sucide case) प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार यासाठी केंद्र सरकारने केव्हाच परवानगी दिली आहे. सुशांत सिंह आत्महत्येला दोन महिने उलटले; मात्र दरदिवशी या प्रकरणाच्या तपासातून नवे खुलासे येत आहेत. हे प्रकरण एका आत्महत्येपुरते मर्यादित न राहता बॉलिवूड नेपोटिझमवरून थेट राजकारणाचा बाग झाला आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे (Shivsena) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या ‘रोखठोक’ या सदरातून विरोधक व केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. एखाद्या घटनेचे राजकारण केले जाते तेव्हा ते कोणत्या स्तरापर्यंत जाईल ते सांगता येत नाही.

सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याच्या दुःखद आत्महत्याप्रकरणात नेमके तेच सुरू आहे. राजकीय भांडवलाने टोक गाठले आहे. असे म्हणत, सुशांत प्रकरणाची ‘पटकथा’ जणू आधीच लिहिली गेली होती. पडद्यामागे बरेच काही घडले असावे, पण जे घडले त्याचे एका वाक्यात सार सांगावे तर, ‘महाराष्ट्राविरुद्धचे कारस्थान’ असेच सांगावे लागेल. असा आरोप राऊत यांनी विरोधकांवर केला आहे. तसेच, ईडी व सीबीआयच्या कार्यप्रणालीवरही संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबई पोलिसांचा तपास सुरू असताना बिहार सरकार सीबीआय चौकशीची मागणी करते, केंद्र सरकार त्यास लगेच मान्यता देते. एखाद्या प्रकरणाचे राजकारण करायचे, त्यासाठी सीबीआय, ईडीसारख्या केंद्रीय संस्थांचा वापर करायचा हे सर्व धक्कादायक आहे. असे राऊत यांनी ‘रोखठोक’मध्ये म्हटले आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयापासून ईडी, सीबीआयसारख्या संस्थांवर गेल्या काही वर्षांत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. असे प्रश्न निर्माण करणाऱ्यांत नरेंद्र मोदी व अमित शहासुद्धा होतेच! गोध्रा दंगल, त्यानिमित्ताने झालेल्या हत्यांचा तपास सीबीआयकडे जाऊ नये, कारण सीबीआय म्हणजे केंद्रीय सत्ताधाऱ्यांचे राजकीय हत्यार असल्याचे मत तेव्हा मोदी-शहांचे होते. हेच मत सुशांत सिंह राजपूत प्रकरणात व्यक्त झाले तर काय चुकले? असा प्रश्न संजय राऊत यांनी आजच्या रोखठोक सदरातून विचारला आहे.

रोखठोक
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे गेला. मुंबई पोलिसांचा तपास सुरू असताना बिहार सरकार सीबीआय चौकशीची मागणी करते, केंद्र सरकार त्यास लगेच मान्यता देते. एखाद्या प्रकरणाचे राजकारण करायचे, त्यासाठी सीबीआय, ईडीसारख्या केंद्रीय संस्थांचा वापर करायचा हे सर्व धक्कादायक आहे.एखाद्या घटनेचे राजकारण केले जाते तेव्हा ते कोणत्या स्तरापर्यंत जाईल ते सांगता येत नाही. सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याच्या दुःखद आत्महत्याप्रकरणात नेमके तेच सुरू आहे. राजकीय भांडवलाने टोक गाठले आहे. सुशांतच्या मृत्यूमागे रहस्य आहे. त्या रहस्यकथेत सिनेमा, राजकारण व उद्योग क्षेत्रांतील मोठी नावे गुंतली आहेत. त्यामुळे मुंबईचे पोलीस नीट तपास करणार नाहीत, अशी तक्रार बिहार सरकारची आहे. मुंबई पोलिसांना तपास जमणार नाही. त्यामुळे तो ‘सीबीआय’कडे द्या, अशी मागणी बिहारच्या सरकारने केली व २४ तासांत ती मागणी मान्यदेखील झाली.

केंद्र सरकारतर्फे ऍटर्नी जनरल तुषार मेहता सर्वोच्च न्यायालयात उभे राहतात व ‘‘सुशांत आत्महत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय झाला आहे.’’ असे सांगतात. राज्याच्या स्वायत्ततेवर हे सरळ आक्रमण आहे. सुशांत प्रकरण आणखी काही काळ मुंबई पोलिसांच्या हाती राहिले असते तर आभाळ कोसळले नसते; पण एखाद्या विषयाचे राजकीय भांडवल व दाबदबावाचे राजकारण करायचेच म्हटले की, आपल्या देशात काहीही घडू शकेल. सुशांत प्रकरणाची ‘पटकथा’ जणू आधीच लिहिली गेली होती. पडद्यामागे बरेच काही घडले असावे; पण जे घडले त्याचे एका वाक्यात सार सांगावे तर, ‘महाराष्ट्राविरुद्धचे कारस्थान’ असेच सांगावे लागेल.

सीबीआय कोणाची?
मुंबई पोलीस ही जगातील सर्वोच्च तपास यंत्रणा आहे. मुंबई पोलीस दबावाला बळी पडत नाहीत. ते पूर्णपणे प्रोफेशनल आहेत. शीना बोरा हत्याप्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला. त्यात अनेक बडी नावे गुंतली होती; पण पोलिसांनी सगळ्यांना तुरुंगात पाठवले. मुंबई पोलिसांनीच २६-११ चा दहशतवादी हल्ला परतवून लावला व भक्कम पुरावे उभे करून कसाबला फासावर लटकवले. त्यामुळे सुशांतसारख्या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करणे हा मुंबई पोलिसांचा अपमान आहे. ‘सीबीआय’ ही केंद्रीय तपास यंत्रणा असली तरी ती स्वतंत्र आणि निःपक्ष नाही हे अनेकदा दिसून आले. अनेक राज्यांनी सीबीआयवर बंदीच घातली आहे.

शारदा चिट फंड प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोलकात्यात पोहचलेल्या सीबीआय पथकाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फक्त रोखलेच नाही, तर सीबीआय पथकावर गुन्हे दाखल करून लॉकअपमध्ये पाठवले. संपूर्ण कोलकाता त्या दिवशी सीबीआयविरुद्ध रस्त्यावर उतरले व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्या गर्दीचे नेतृत्व रस्त्यावर उतरून करत होत्या. ज्यांचे सरकार केंद्रात असते, सीबीआय त्यांच्या तालावर काम करत असते. सर्वोच्च न्यायालयापासून ईडी, सीबीआयसारख्या संस्थांवर गेल्या काही वर्षांत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. असे प्रश्न निर्माण करणाऱ्यांत नरेंद्र मोदी व अमित शहासुद्धा होतेच! गोध्रा दंगल, त्यानिमित्ताने झालेल्या हत्यांचा तपास सीबीआयकडे जाऊ नये, कारण सीबीआय म्हणजे केंद्रीय सत्ताधाऱ्यांचे राजकीय हत्यार असल्याचे मत तेव्हा मोदी-शहांचे होते.

हेच मत सुशांत सिंह राजपूत प्रकरणात व्यक्त झाले तर काय चुकले? सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या केली असे सकृद्दर्शनी दिसते. हा खून आहे असे जे वारंवार सांगितले जाते त्यास तसा आधार नाही. अभिनेत्याचा खून घडवून आणला व त्यात सिनेसृष्टी व राजकीय नेत्यांचे संगनमत आहे, असे ओरडून सांगणे हा तापलेल्या तव्यावर पोळ्या भाजू इच्छिणाऱ्या गटारी पत्रांचा व वृत्तवाहिन्यांचा प्रचार साफ खोटा होता. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. ते कसेही करून पाडायचे. पडत नाही म्हटल्यावर बदनाम करायचे असे विरोधकांनी ठरवले व भारतीय जनता पक्षाच्या सर्वच प्रकारच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या वृत्तवाहिनीतून त्यांनी सुशांत प्रकरणात आघाडी उघडली. त्या वृत्तवाहिनीच्या प्रमुखाने केले ते ‘गॉसिपिंग!’ लोकांच्या मनातील संशय वाढवला.

अर्णब गोस्वामी हे ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीचे प्रमुख. ते राजकीय नेत्यांचा, मुख्यमंत्र्यांचा सरळ एकेरी भाषेत उल्लेख करतात, बदनामीकारक भाषा वापरतात, धमक्या देतात. सोनिया गांधींच्या बाबतीत त्यांनी हेच केले व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून आव्हानाची भाषा करतानाही त्यांना लोकांनी पाहिले. हे सर्व पाहिल्यावर श्री. शरद पवार यांनी मला फोन केला, ‘‘एका वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत होतोय. हे बरोबर नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ही फक्त एक व्यक्ती नसते, तर संस्था असते.’’ ‘Institute’ असा उल्लेख त्यांनी केला. शेवटी त्यांनी प्रश्न केला, ‘‘मग सरकार काय करते?’’ पवार यांचे मत एका अनुभवी नेत्याचे मत आहे. पत्रकारितेचे हे चित्र चांगले नाही. एक वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत गरळ ओकते व ते सहन केले जाते. त्या वृत्तवाहिनीस महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बळ देतात. सुशांत सिंह हे निमित्त व त्यानिमित्ताने सरकार बदनाम करायचे हे मुख्य कारस्थान. ते सुरूच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER