बेळगावमध्ये मराठी-कन्नड वाद चिघळला; राऊत म्हणाले, आमचेही हात बांधलेले नाही

Belgaum dispute

मुंबई : कर्नाटक सीमावादाच्या (Karnataka border dispute) प्रश्नावरून बेळगावात (Belgaum dispute) मराठी विरुद्ध कन्नड वाद चांगलाच चिघळला आहे. बेळगावात कन्नड लोकांनी एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना घडल्याने दोन्ही राज्यातील बससेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. आणि याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवरच टीकास्त्र सोडले. बेळगावात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद गेल्या काही दिवसांपासून पेटला आहे. बेळगावात कानडींकडून मराठी माणसांवर खुनी हल्ले सुरू आहे. त्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असं सांगतानाच पश्चिम बंगालमधील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर गप्प का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना बेळगावातील हल्ल्यांवरून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. कन्नड वेदिकेकडून बेळगावमध्ये हल्ले सुरू असून या ठिकाणी सर्व पक्षीय शिष्टमंडळ पाठवलं पाहिजे. नाही तर कर्नाटकात तणाव वाढेल, असं सांगतनाच मी सुद्धा बेळगावला जाणार आहे. सांगली, सोलापूरचे लोक बेळगावात घुसले तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल. हा भाषा वाद आहे. तो फार वाढू नये. आम्ही राष्ट्रीय एकात्मता मानतो. कर्नाटकनेही राष्ट्रीय एकात्मता मानली पाहिजे. बेळगावात कर्नाटक सरकारची दडपशाही सुरू आहे. कन्नड वेदिका संघटनेच्या फडतूस लोकांनी वातावरण बिघडवले आहे. ही भाजप स्पॉन्सर संघटना असून बेळगावातील परिस्थितीला भाजपच जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

बेळगावात आमची डोकी फोडण्याचा कार्यक्रम सुरू असेल तर आमचेही हात बांधलेले नाहीत. आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, हा काही भारत-पाकिस्तान वाद नाही. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ या प्रश्नात लक्ष घालावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER