आम्हीही आमच्या पद्धतीने आघाडी सरकार पाच वर्षे चालवणार – संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘डिझॅस्टर टुरिझम’ अशी टीका केल्यानंतर फडणवीस यांनी या टीकेला उत्तर देत आदित्य ठाकरे याना ‘नया है वह’ म्हणत त्यां टीकास्त्र सोडले होते. फडणवीसांनी केलेल्या टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधीपक्ष नेते फडणवीसांना उत्तर दिले. नरेंद्र मोदी-अमित शाह हे दिल्लीत, तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात नवेच आहेत, असं म्हणत राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

देवेंद्र फडणवीसही नवेच आहेत, ते जुने कुठे झाले आहेत. तरुणांना संधी द्यावी, या मताचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही आहेत. अमित शाहसुद्धा दिल्लीच्या राजकारणात नवीनच आहेत. मात्र त्यांनी गृहमंत्री म्हणून दिल्लीत उत्तम काम केले आहे. मोदीही दिल्लीत नवे होते, त्यांनी उत्तम काम केले, आम्ही कौतुक करतोच की. त्यांना आम्ही नया है वह म्हटलं का? आदित्य ठाकरे हे मंत्री म्हणून चांगले काम करत आहेत, अशा शब्दात राऊतांनी निशाणा साधला.

यावेळी त्यांनी राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीयनाट्यावरही भाष्य केलं. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद वैयक्तिक आहेत. त्यामुळे लवकरच तो वाद मिटेल. सरकारला कोणताही धोका निर्माण होणार नाही. मध्य प्रदेश गेल्यानंतर काँग्रेसने आता राजस्थान वाचवायला हवं. अन्यथा वेगळा संदेश जाईल .भगवान शंकराशी निगडीत कमळाच्या फुलाचे ‘ऑपरेशन कमळ’ करुन स्थिर सरकार पडण्याची फार चुकीची पद्धत सुरु आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.

महाराष्ट्रात नंबरच लावणार आहेत न? मग आम्हालाही आमच्या पद्धतीने नंबर लावता येईल. हे सरकार पाच वर्ष टिकणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सरकारला अशाप्रकारचा कोणताही धोका नसल्याचे राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. महाराष्ट्र सरकारला नख लावणं इतकं सोपं नाही. हे मध्य प्रदेश किंवा राजस्थान नव्हे . ठाकरे सरकार सध्या ऑपरेशन कोरोनामध्ये व्यस्त आहेत. देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील यांनी राजकारण केलेच पाहिजे, त्यांना भरपूर वेळ देऊ, खेळत बसा, असा टोला राऊतांनी लगावला.

सामना’चा खप वाढविण्यासाठी शरद पवार यांची मुलाखत घेतल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावर उत्तर देताना, ‘सामना’ काय आहे, हे चंद्रकांत पाटील यांनी सांगावं अशी वेळ आलेली नाही, असा खरपूस समाचार राऊत यांनी घेतला. एखाद्या नेत्याला ठरवून टार्गेट करणे हा सामनाचा अजेंडा कधीच नव्हता. तुमचीही वृत्तपत्रे आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी. बघूया ते मुलाखत देतात का आणि ते ही मुलाखत छापण्याची हिंमत दाखवतात का? असे आव्हानही राऊतांनी दिले.

अनेक एनजीओ कोरोना संकटात काम करत आहेत, याचा अर्थ धारावीतील कामाचे श्रेय कोणी घेऊ नये, मुख्यमंत्री धारावीतील परिस्थितीकडे स्वतः लक्ष ठेऊन आहेत. असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER