मी घाबरणाऱ्यांमधला नाही, शिवसेनेतच राहणार, शिवसेनेतच मरणार’ – संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई : ज्यांच्याकडे लपवण्यासारख्या काही गोष्टी असतात, ते घाबरुन भाजपमध्ये (BJP) प्रवेश करतात, मात्र आम्ही शिवसेनेत (Shivsena) आहोत, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं. मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असा इशाराही राऊतांनी दिला. पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना आलेल्या ईडी नोटिशीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी (Sanjay Raut) पत्रकारांशी संवाद साधला.

ईडी ही सरकारी संस्था आहे. सरकारी कागदपत्रांकडे कानाडोळा करु शकत नाही, भले कायद्यावर कोणाचाही दबाव असला, तरी आम्ही कायदे मानतो. कायद्यांचं पालन करतो. मी अद्याप ईडीची नोटीस पाहिली नाही, त्याची मला गरजही वाटत नाही, पण तिचं उत्तर देणार आहोत, ईडी ५ जानेवारी पर्यंत वेळ मागितला आहे. आम्ही कधी काही लपवलेले नाही. खासदार आहे नियमाचे पालन करणारा आहे. असं संजय राऊत म्हणाले.

हे राजकारण कसं सुरु आहे, ते मला माहिती आहे, ते चालू द्या, मला त्यात पडायचं नाही, असं राऊतांनी स्पष्ट केलं. भाजपच्या त्या तीन नेत्यांबद्दल विचारलं असता हळूहळू त्यांची माहिती देणार असल्याचं संजय राऊत म्हणाले. आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही, लपवाछपवी करणारे पळून जातात, आम्ही मध्यमवर्गीय कुटुंब सरळमार्गाने सरकारी यंत्रणांना सामोरे जातो. सरकार पाडण्याची धमकी दिली जात आहे, मात्र मला धमकी देणारा अजून जन्माला यायचा आहे, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असं राऊतांनी निक्षून सांगितलं.

सध्या ईडीसारख्या सरकारी संस्थांना काही काम राहिलेलं नाही. भाजपच्या विरोधकांचा मानसिक छळ करणे हे त्यांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यांनाही काही काम हवं, त्यांना सरकारचे आदेश पाळण्याचं काम करावं लागत आहे. ईडीची मला कीव येते, कारण अशा सरकारी संस्थांना एके काळी प्रतिष्ठा होती, तरीही सत्यमेव जयतेचा शिक्का असलेल्या सरकारी कागदपत्रांचा मी आदर करत राहीन, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

राज्यसभा उमेदवारीच्या वेळी प्रतिज्ञापत्रात मी सगळी माहिती दिली होती, ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं, ते घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात, आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार, असं राऊत यांनी पुन्हा एकदा ठणकावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER