जातीच्या आधारावर आरक्षण नको, हीच शिवसेनेची भूमिका – संजय राऊत

मुंबई :- आपला देश घटनेच्या आधारावरच चालणारा आहे. सर्वांना समान हक्क मिळाला पाहिजे. देशात जातीवर आधारित आरक्षण (Reservation) असू नये ही शिवसेनेची (Shivsena) पहिल्यापासूनची भूमिका आहे. देशातील कोणत्याही नागरिकाला आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण मिळायला पाहिजे, असं आम्हाला वाटतं, असं सांगतानाच दलितांना अनेक वर्षांपासून आरक्षण मिळतंय.

त्यामुळे आरक्षणामुळे पुढारलेल्या दलितांनी आता आरक्षण सोडलं पाहिजे, असं मत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं. प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा यांनी ‘शट अप या कुणाल’ (Shut up or Kunal) या युट्यूब चॅनेलसाठी संजय राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी राऊत यांनी विविध विषयांवर मतं व्यक्त करतानाच आरक्षणावरही आपली भूमिका व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा निर्णय महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार घेईल. सध्या हा विषय न्यायालयात आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करता येणार नाही, असं राऊत म्हणाले.

पण आरक्षणाबाबत सांगायचं तर आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं ही आमची जुनीच भूमिका आहे. जातीच्या आधारावर आरक्षण नको, ही भूमिका आम्हीच मांडली. या देशातील कोणत्याही व्यक्तीला मग तो मुस्लिमही का असेना प्रत्येकाला आर्थिक निकषावरच आरक्षण मिळालं पाहिजे, असं सांगतानाच दलितांनी तर वर्षानुवर्षे आरक्षण घेतलं आणि पुढे गेले. दलितांमधील या पुढारलेल्या आणि आर्थिक सुबत्ता चांगली असलेल्या लोकांनी कधी ना कधी तरी आरक्षण सोडलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

मुस्लिमांच्या व्होट बँकेचं राजकारण नको
यावेळी त्यांनी मुस्लिमांच्या लांगूलचालनाच्या राजकारणावरही टीका केली. देशात मुस्लिमांच्या व्होट बँकेचं राजकारण सुरू आहे. मुस्लिम  या देशाचेच नागरिक आहेत. परंतु काही राजकीय पक्ष त्यांच्या मतांचं राजकारण करत असतात. त्यामुळे नुकसान हे देशाचंच होत असतं. त्यांचंही नुकसान होतं. कायम त्यांनी  अंधारात राहावं आणि त्यांनी आपल्या मागं  यावं अशी त्या पक्षांची इच्छा असते. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याची मागणी केली होती. मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेतल्यावर त्यांचे मसिहा म्हणवून घेणारे पळून जातील, असं बाळासाहेब ठाकरे सांगायचे. देशात व्होट बँकेचं राजकारण नसावं.

सर्वांना समान अधिकार मिळावा ही आमची भूमिका आहे; पण या देशात सुरुवातीपासूनच लांगूलचालन केलं जात आहे. त्याला आमचा विरोध आहे, असं राऊत म्हणाले. सेक्युलर शब्दावरूनही त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. सेक्युलर हा शब्द सध्या शिवीसारखा झाला आहे. आपल्या देशात कोणीही सेक्युलर नाही. या देशात कोणीही सेक्युलर होऊ शकत नाही. जे सेक्युलर असल्याचं म्हणातात तेच सर्वाधिक धर्मांध असतात. सेक्युलर ही एकप्रकारची शिवी आहे. त्याचा चुकीच्या पद्धतीनं वापर राजकारणात करण्यात आला आहे. या शब्दाचा देशात चुकीचा वापर केला जात आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लिम अशी विभागणी झाली आहे, असं सांगतानाच हिंदूंना शिवी देणं म्हणजेच सेक्युलर असणं आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ही बातमी पण वाचा : भाजपनं ठरवलं तर तुम्ही रक्तबंबाळ व्हाल’, दरेकर यांचं राऊतांना सणसणीत प्रत्युत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER