छत्रपतींवर प्रहार आणि काँग्रेससाठी माघार

Sanjay Raut

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी बुधवारी बुद्धिवंतांच्या नगरीत म्हणजे पुण्यामध्ये एका मुलाखतीत जे काही अकलेचे तारे तोडले त्याचे तीव्र  पडसाद उमटणे साहजिकच होते आणि त्यानुसार ते उमटत आहेत. संजय राऊत यांनी पुण्यात काल एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे त्यावेळचा बादशहा करीम लाला याच्याशी निकटचे संबंध होते आणि करीम लाला याला भेटण्यासाठी इंदिराजी मुंबईत येत वगैरे मुक्ताफळे त्यांनी उधळली आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमबद्दलही ते बोलले.  उदयनराजे भोसले यांनी छत्रपतींचे वंशज असल्याचा पुरावा आणावा असे आव्हान राऊत यांनी दिले. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना ते स्टेपनी म्हणाले. एकाच मुलाखतीत सगळ्यांना दुखावण्याचा जाहीर कार्यक्रम त्यांनी ठरवून केला.

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली त्याच पक्षाचा एक जबाबदार नेता,प्रवक्ता आणि खासदार त्याच छत्रपतींच्या वंशजांना पुरावा मागत असल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले.

संजय राऊत सरकारला खाणार?

इंदिराजींबद्दल राऊत जे काही बोलले त्यावर त्यांनी आता यू-टर्न घेतला असून आधीची विधाने मागे घेतली आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राऊत यांच्या विधानांविषयी तीव्र नापसंती व्यक्त केल्यानंतर राऊत यांनी ती वाक्य मागे घेतली पण, ती मागे घेऊन काय साधणार? राऊत यांची कालची मुलाखत जगभर व्हायरल झाली. यूट्यूबवर त्याचे व्हिडिओ पडले आहेत. त्यामुळे राऊत यांनी विधान मागे घेणे केवळ हास्यास्पद आहे आणि त्यांचे विधान मागे घेण्याचे नाटक म्हणजे काँग्रेसची शुद्ध फसवणूक आहे. या निमित्ताने काँग्रेसने स्वतःचे खोटे समाधान तेवढे करून घेतले आहे. राऊत हे इंदिरा गांधी यांच्याबद्दल जे बोलायचे होते ते ते बोलून गेले. आता ते पब्लिक डोमेनमध्ये आहे ते कोणीही हटवू शकत नाही. काँग्रेसने तीव्र हरकत घेतल्यानंतर राऊत यांनी यू-टर्न घेणे अपेक्षितच होते. माहिती अशी आहे की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राऊत यांना यू-टर्न घ्यायला लावला तसेही राऊत हे पवार यांचेच ऐकतात. इंदिराजींच्या विषयी केलेली विधाने राऊत यांनी काही तासातच मागे घेतली कारण त्यांना सरकार टिकवायचे आहे. त्यामुळे आधी घेतलेली भूमिका काही तासात मागे घ्यावी लागते, सरकार टिकवायचे तर नागरिकत्व कायद्याला विरोध करावा लागतो, सरकार टिकवायचे तर हिंदुत्वाला मूठमाती देऊन धर्मनिरपेक्षता स्वीकारावी लागते. सत्तेच्या लाचारीतून आलेली ही अगतिकता आहे. ती राऊत यांनी दाखवली, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागणारे विधान त्यांनी मागितलेले नाही. कारण ते मागे घेतले काय आणि न घेतले काय त्यामुळे काँग्रेस व दुसरा सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघेही दुखावत नाहीत, उद्धव ठाकरे सरकारच्या स्थिरतेवर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळेच शिवरायांच्या वंशजांयाबद्दलचे विधान मागे घेण्याचीची गरज ती काय असा उद्दामपणा राऊत यांचनी चालविलेला दिसतो. ज्या अजित पवार यांच्या पाठीशी राष्ट्रवादीतील चाळीसहून अधिक आमदार आजही कोणत्याही परिस्थितीत भक्कमपणे उभे आहेत, जे उपमुख्यमंत्री म्हणून आठ-पंधरा दिवसातच अत्यंत चांगली छाप पडत आहेत अशा अजित पवार यांना राऊत यांनी स्टेपनी म्हणून हिणवणे हे योग्य नाही.

राऊत यांनी जी काही विधाने केली त्यामुळे एकाच वेळी काँग्रेस, छत्रपती शिवरायांचे लाखो चाहते;अनुयायी, अजित पवार यांना मानणारा राष्ट्रवादीतील मोठा वर्ग हे सगळे दुखावले. महा विकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यासाठी ज्यांनी संकटमोचक म्हणून कामगिरी बजावली त्या संजय राऊत यांनी आज शिवसेनेला चांगलेच अडचणीत आणले आहे.

काय बोलायचे ते आधीच ठरले होते 
आता महाराष्ट्राला माहिती नसलेली अंदर की बात आम्ही सांगत आहोत.” मी भावनेच्या भरात बोललो, अचानक समोरून मुलाखतकर्त्याचा प्रश्न आल्याने मी तसे उत्तर दिले असा बचाव संजय राऊत करून घेऊ शकत नाहीत. कारण या मुलाखतीतील प्रश्न आणि उत्तर यांची रिहर्सल तीन दिवसांपूर्वीच झालेली होती, अशी आमची खात्रीलायक माहिती आहे. याचा अर्थ जे काही राऊत बोलले ते ठरवून बोलले आहेत. त्यांची जीभ घसरलेली नाही. मुलाखतकर्त्याने कोणते प्रश्न विचारायचे आणि राऊत यांनी कोणती उत्तरे द्यायची याची प्रॅक्टिस आधीच झालेली होती. त्यासाठी तीन तासाचे एक सेशन झाले होते.

यावरून हे स्पष्ट होते की इंदिराजी आणि अंडरवर्ल्डचा विषय राऊत यांना उकरून काढायचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांबाबत त्यांना संशयाचे वातावरण निर्माण करायचेच होते आणि अजित पवार यांना स्टेपनी म्हणून हिणवायचेही होते.