संजय राऊत माझ्यासाठी एवढे महत्त्वाचे नाहीत; फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर

Sanjay Raut - Devendra Fadnavis

परभणी :- लोकशाहीत कोणी कुणाचा शत्रू नसतो. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे. ते खडसेंच्या घरी गेले, त्याचं स्वागत आहे. त्याआधी ते शरद पवारांना (Sharad Pawar) जाऊन भेटले. त्यांचं मार्गदर्शन घेतलं असेल. मागे आम्ही भेटून लंचही घेतलं होतं. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. कशाला धुरळा उडवता?- असा टोला शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला होता. त्यानंतर फडणवीस यांनी राऊतांच्या विधानाचा समाचार घेतला. संजय राऊत एवढे महत्त्वाचे नाहीत. त्यांच्याबद्दल मी काय बोलायचं?- अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या विधानाकडे दुर्लक्ष केले.

देवेंद्र फडणवीस आज परभणीच्या दौऱ्यावर आहेत. परभणीत त्यांनी आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी चर्चा करत संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मी कालच राऊतांबद्दल बोललो आहे. त्यांच्याबद्दल मी रोज रोज काय बोलावं? माझ्यासाठी ते एवढे महत्त्वाचे नाहीत, असे म्हणत फडणवीस यांनी संजय राऊतांवर पलटवार केला.

परभणीतील कोरोना आटोक्यात येत आहे. कोरोनाची (Corona) तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना आखल्या जात आहेत, ही समाधानकारक बाब आहे. तसेच रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांचे ऑडिट करणे गरजेचे आहे. त्याची माहिती सरकारने घेतली पाहिजे आणि संबंधितांवर कडक कारवाई केली पाहिजे. सरकारकडून कोरोना मृत्यूची संख्या लपवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याबद्दलही त्यांनी सरकारवर टीका केली. पीक विमा आणि केंद्र सरकारचा काहीच संबंध नाही. राज्य सरकारने टेंडर उशिरा काढले. तसेच पीक विम्याचे नियम बदलले. कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी करत आहे. त्यांना पैसे न दिल्यास शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. आमचे सरकार असताना शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेवर पैसे जमा केले जात होते. गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही, असेही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : केंद्राने दिलेले व्हेंटीलेटर्स उत्तम – देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button