
मुंबई :- शिवसेनेचे (Shivsena) खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अग्रलेखातील भाषेवरुन भाजप (BJP) नेते चंद्र्कांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संताप व्यक्त केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावरुन सामनाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे यांना नुकतच एक पत्र लिहिलं आहे. या पत्रावरुनच आता संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे आहे. दादांनी पत्र लिहिणे म्हणजे सगळ्यांचीच दाणादाण उडणार. पुन्हा भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी सुरु केली आहे. प. बंगालातील भाजप नेत्यांची अलीकडची भाषणे दादांच्या हवाली करुया. तेथे भाषाशुद्धीसंदर्भात मोठे काम चंद्रकांत पाटलांना करावे लागणार आहे. चीनने लडाखची जमीन गिळली तरी चालेल, पण मुंबईतल्या इंच इंच जमिनीसाठी किटल्यांनी उकळायलाच पाहिजे! दादा, उचला लेखणी, करा त्या ढोंगावर हल्ला! महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे!’, अशा शब्दात राऊत यांनी पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले .
आजचा सामनातील अग्रलेख :
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे विरोधी पक्षनेते आहेत, पण चायपेक्षा किटली गरम असे काही लोकांचे सुरु आहे. उठसूट फक्त विरोध, दुसरे काही नाही. “मुंबईतील महाकाली गुंफा विकू देणार नाही, एक इंचही जागा बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही”, अशा विरोधी वक्तव्याच्या उकळ्या काही किटल्यांना फुटल्या आहेत. भाजपच्या ध्यानीमनी, स्वप्नी बिल्डरच आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही निर्णयात बिल्डरच दिसत असावेत. राज्य सरकारने कोणताही निर्णय घ्यायचा म्हटलं की, ‘ब्लॅकमेल’ करणारी किरकिराटी मांजरे आडवी घालायची, हे जणू धोरणच झाले आहे, अशी टीका राऊतांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजप नेत्यांवर केली आहे.
लडाखच्या हद्दीत चीनचे सैन्य घुसून त्यांनी इंचभर नाही, तर मैलौन्मैल हिंदुस्थानी जमीन कब्जात घेतली आहे. त्यावर या किटल्या का तापत नाहीत, हा प्रश्नच आहे. लडाखची जमीन अगदी इंच इंच पद्धतीनं चिन्यांच्या घशात गेली तर चालेल का, तेवढे जरा सांगा. भारतीय जनता पक्षाचे हे ढोंग आहे व या ढोंगाचा बुरखा चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या मशहूर पत्रलेखकांनी आता फाडायलाच हवा. चंद्रकांत पाटील हे हल्ली वाचकांची पत्रे, तक्रारी, सूचना वगैरे सदरांखाली पत्र लिहून अनेक विषयांना वाचा फोडतात.
मुख्य म्हणजे भाषाशुद्धीची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. भाजपमध्ये नवे तर्खडकर उदयास आले असून संपूर्ण भाजपला त्यामुळे गलिच्छ विचार आणि भाषेला तिलांजली द्यावी लागेल. काही चुकीचे बोललात की, पत्रलेखक पाटील त्यांची कागदी तलवार सपकन बाहेर काढतील व तक्रारी सूचना सदरात वार करतील, अशा शब्दात राऊतांनी चंदक्रांत पाटलांवर पलटवार केला आहे .
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला