‘किमान माणुसकी तरी बाळगा’, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांकडून भाजप लक्ष्य

Sanjay Raut

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतल्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांनी भाजप (BJP) नेत्यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भाजप नेत्यांना महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. किमान अशा प्रकारात तरी माणुसकी ठेवा. सत्यता तपासून मत व्यक्त करा, तपास यंत्रणांना वेळ द्या, असा सल्ला राऊत यांनी दिला आहे.

मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो आधी सत्य बाहेरपडू द्या. राजकारण आणि समाजकारणात जागा मिळवण्यासाठी अनेक वर्षे खर्ची घालावे लागतात. मात्र, एखाद्या तक्रारीवरुन उद्ध्वस्त करणं हे माणुसकीला धरुन चालत नाही, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत अनेकवर्षे काम केलं आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा मागणाऱ्यांना माझा सल्ला आहे की, अशा प्रकरणामध्ये तरी राजकीय राग, लोभ, द्वेष मध्ये आणू नका. अशा प्रकरणात किमान माणुसकी ठेवली पाहिजे. वेळ दिला पाहिजे. धनंजय मुंडे यांच्यावरील जो डाग दूर झाला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीनं सुटकेचा निश्वास सोडला आहे. कारण, कोणत्याही मंत्र्यांवर अशाप्रकारचे आरोप होणं योग्य नाही. पण आता ती जळमटं दूर झाली, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात फार संयमी भूमिका घेतली होती. फडणवीसांची ही भूमिका भाजपच्या अन्य नेत्यांनी समजून घ्यायला हवी. कारण चारित्र्यहनन हे राजकारणात हल्ली एक मोठं शस्त्र बनत आहे. हनीट्रॅप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, राजकारण नाही. जर ते कुणी करत असेल तर ते महाराष्ट्राला डाग लावत आहेत, असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, राजकीय दबावातून रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली असावी, अशी शक्यता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. त्यावर बोलताना “राजकीय दबाव आणून प्रश्न सोडवणं ही त्यांची संस्कृती असेल. राजकीय दबाव काय करु शकतात हे आम्ही अर्णव गोस्वामी प्रकरणात पाहिलं आहे. राजकीय दबाव काय करु शकतो हे आम्ही त्या नटीच्या प्रकरणात पाहिलं. त्यामुळे त्यांना राजकीय दबावाची ती व्यवस्था माहिती असेल. केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात कुठे राजकीय दबावाचा प्रकार सुरु असेल तर त्याची माहिती आम्ही सुधीरभाऊंकडून घेऊ,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

अर्णव गोस्वामी आणि बार्कच्या माजी सीईओच्या कथीत चॅट प्रकरणावरुनही राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या विषय आहे. देशात आम्ही सत्तेत असतो आणि भाजप विरोधी पक्षात तर देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर त्यांनी आतापर्यंत तांडव केलं असतं. प्रधानमंत्री कार्यालयावर मोर्चे काढले असते. आज भाजप का गप्प आहे ? राष्ट्रीय सुरक्षा इतकी स्वस्त आहे का ? असा सवाल राऊत यांनी केलाय. त्याचबरोबर अर्णब गोस्वामी कुठे आहेत हे भाजपला माहीत असेल. कारण देश त्यांच्या ताब्यात आहे. मुंबई पोलीस योग्य वेळी तपास करतीलच. ण ते कुठे आहेत, काय करीत आहेत याची माहिती भाजपला असावी, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER