
मुंबई : आज शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन सर्वाना बुचकळ्यात टाकले. राऊत यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेत राज्यातील परिस्थिती आणि सरकारतर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत सर्वात आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण काढत त्यांना चक्क डॉक्टर म्हणून संबोधित केले.
यामागचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी पुण्यात होते. कोरोनाशी दोन हात करता यावे यासाठी पुण्याच्या स्मार्ट सिटी कार्यालयात उभारलेल्या वॉर रुमला भेट देऊन त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिका अधिकाऱ्यांनी केलेले सादरीकरण आटोपल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकारांनी हातात असलेले बूम माईक अजित दादांसमोर करताच त्यांनी दूर करण्याचे सांगितले. याच्यामुळे कोरोना होतो. असे म्हणत न बोलताच निघून गेले. आणि असाच काही प्रसंग आज राऊतांसोबत घडला.
राज्यपालांच्या भेटीनंतर त्यांचा ‘बाईट’ घेण्यासाठी राजभवनाबाहेर वृत्तवाहिन्या सज्ज होत्या. त्यांना पाहून संजय राऊत आपल्या कारमधून उतरून आले. त्यांचं पहिलं वाक्य होतं, ‘‘ अजित पवार काल म्हणालेत बूम (माईक) लांब ठेवा. त्याने कोरोना होतो, असं ‘डॉक्टर’ अजित पवारांनी सांगितलंय.’’ त्यातही डॉक्टर या शब्दावर त्यांचा जरा जास्तच जोर होता. त्यांनी असा उल्लेख का केला असेल, ती गंमत असेल की चिमटा, हे सांगण्याची गरज नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला