संजय राऊत यांचा काँग्रेसवर ‘हल्लाबोल’; ‘त्यांना’ सावरकरांच्याच कोठडीत ठेवा!

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसवरच आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार ‘हल्लाबोल’ केला. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता मिळविली आहे, हे विशेष. ‘भारतरत्न’साठी विरोध करणारे कुणीही असो, त्यांना सावरकरांच्याच कोठडीत दोन-दोन दिवस ठेवा, असा घणाघात आज खा. संजय राऊत यांनी एका खाजगी मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

महाराष्ट्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यास विरोध केला आहे, हे येथे उल्लेखनीय. आज वृत्तवाहिनीशी बोलताना खा. संजय राऊत म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी काय केले, ते आम्हाला कुणी सांगू नये. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते आहेत, मात्र, ‘भारतरत्न’ देण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयाकडून घेण्यात येतो.

सावरकरांचा सन्मान व्हावा ही आमची नेहमीच मागणी राहिली आहे. जे लोक त्यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी विरोध करतात, ते कोणत्याही पक्षाचे असोत, त्या सर्वांना दोन-दोन दिवस अंदमान तुरुंगात सावरकरांच्याच कोठडीत ठेवायला पाहिजे. मगच त्यांना सावरकरांनी देशासाठी किती त्याग केला ते कळेल.

संजय राऊत बेळगावात दाखल; कर्नाटक सरकारसोबत ‘सामना’!