संजय राऊत मोदींनाही धमकी देतात, मी तर घाबरलोच; राष्ट्रवादीच्या आमदाराची खोचक टीका

Maharashtra Today

पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणत्याही नेत्यांवर टीका-टिप्पणी करण्यासाठी त्यांना परवाना देण्यात आला आहे. ते पंतप्रधानांनाही धमकी देऊ शकतात. मी तर अगदी लहान माणूस आहे. माझ्या तालुक्यात येऊन त्यांनी मलाही धमकी दिली आहे. त्यामुळे मी घाबरलो आहे. मला त्यांची भीती वाटते; म्हणून सरकारला मला आता पोलिस संरक्षण द्यावे लागेल, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांनी संजय राऊतांवर केली.

खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी काल संजय राऊत यांनी मोहिते यांच्यावर निशाणा साधला होता. अजितदादांनी मोहितेंचा बंदोबस्त करावा; अन्यथा हा विषय शिवसेनेकडे सोपवावा, सत्तेत असो वा नसो पुढच्या निवडणुकीत शिवसेना त्यांना नक्कीच पाडणार, असा धमजकीवजा इशारा, संजय राऊत यांनी दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना मोहिते पाटील यांनी शेलक्या शब्दात संजय राऊतांचा समाचार घातला.

ते म्हणाले की मी मागच्या दाराने आमदार किंवा खासदार झालेला नाही. मला जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे मला माजी आमदार करायचा निर्णय जनतेच्या हातात असणार आहे. जनतेमध्ये जाऊन लोकांचे मत जाणून घेऊन एखाद्या नेत्याने, मला माजी आमदार करण्याची भाषा वापरली असती, तर बरे वाटले असते, असा चिमटाही आमदार मोहिते यांनी राऊत यांच्या राज्यसभा सदस्यावरून काढला.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे नेतृत्व मान्य केले आहे. मुख्यमंत्री जे सांगतील, त्याच पालन आम्ही करतो. मग माझ्यावर टीका करण्यापूर्वी राऊत यांसारख्या मोठ्या नेत्याने माझ्याशी चर्चा करुन वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी होती. जर ते समाधानी झाले नसते तर मग बोलायला पाहिजे होते. माझा त्या प्रकरणात कुठलाही संबंध नाही, हे त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे होते. त्यांनी केवळ कानावर आलेल्या माहितीमुळे माझ्यावर आरोप करणे, अत्यंत चुकीचे आहे. मी सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांच्याशी बोलून त्यांना स्पष्टीकरण दिलेले होते. पण, राऊतसाहेब अचानक माझ्या तालुक्यात येऊन बोलले, असेही मोहिते यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांना ही सर्व चुकीची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव देतात. कारण, सध्या काम नसलेला नेता हे फक्त आढळराव-पाटील आहेत. खासदार असताना त्यांनी कुठलेही काम केले नाही आणि खासदारकी गमावल्यानंतर आता ते अस्वस्थ झालेले आहेत. फक्त, खेड तालुक्यात यायचं आणि राजकारण करायचं, एवढंच काम ते करत असतात. माझ्या तालुक्यावर त्यांचे विशेष प्रेम आहे. त्यांची इथे मालमत्ता आहे. ते बाकीच्या भोसरी, हडपसर, भोर इत्यादी मतदारसंघात जात नाहीत, असा चिमटा मोहिते यांनी आढळरावांना काढला.

अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे नेते आहेत. जिल्हा कसा चालवायचा, याचे सर्व निर्णय ते घेतात. त्यांना राजगुरुनगरला आणून जागा दाखवल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढे कार्यवाही केली. पंचायत समितीच्या जागेवर, पंचायत समिती इमारतीसाठी जागा आहे आणि प्रशासकीय इमारत त्याच्या समोरच्या जागेत व्हावी. एवढी छोटीशीच गोष्ट होती. त्याचा पराचा कावळा यांनी केला, असेही मोहिते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button