संजय राऊतांनीही नरेंद्र मोदींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केली होतीच – तरुण भारत

नागपूर : भाजपाचे नेते जयभगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. आजचे शिवाजी कोण यावरून प्रत्येक पक्षात चढाओढ सुरु झाली. या संपूर्ण पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपले मुखपत्र असलेल्या सामानातून भाजपाला लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे भाजपाशी जवळीक असलेल्या तरुण भारत या वृत्तपत्रातून शिवसेनेवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

संजय राऊत यांनी सामनामधून तसेच स्वतःच्या ब्लॉगद्वारे बाळासाहेब ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हटले होते. त्यांच्या त्या सर्व लेखांचे एकत्रित ‘युगान्त’ हे पुस्तक संजय राऊत यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेखही एकेरी करण्यात आला आहे. अशी बातमी तरुण भारताने प्रकाशित केली आहे. दिनांक २० नोव्हेंबर २०१२ रोजीच्या लेखात संजय राऊत लिहितात, शिवसेनाप्रमुखांकडे पाहायला लागलो म्हणजे एकदम शिवाजी दिसायला लागायचे. दिनांक २३ नोव्हेंबर २०१२ रोजी संजय राऊत यांनी ‘संजय उवाच’ असा लेख लिहिला आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूचे वर्णन त्यात करतना शिवाजी महाराजांची उपमा संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुखांना दिली होती. संजय राऊत लिहितात, महाराष्ट्राने त्यांचा दुसरा शूर शिवाजी गमावला आहे यातच सर्व आले.

युगान्त पुस्तकाच्या पान क्र. ८८ वर संजय राऊतांनी लिहिले आहे की, अयोध्येतील राममंदिराची जागा, रायगडावरील शिवाजी महराजांच्या समाधी स्थळाची जागा आणि शिवतीर्थावरील बाळासाहेबांचे समाधीस्थळ या जागांचे पावित्र्य सारखेच आहे. दिल्लीतील काही भाजप कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी आणि शिवाजी महाराज यांची थेट तुलना केल्याने भाजपावर सतत टीका केली जात आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा संजय राऊत यांनीही दिली होती, हे खूप कमी जणांना माहिती असेल, असेही तरुण भारताने म्हटले आहे.