संजय राऊतही म्हणतात पत्रकार ‘फ्रन्ट लाईन वर्करच’ ; आत्तापर्यंत 235 जणांचा मृत्यू

Sanjay Raut

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . या संकटमय काळात अनेक पत्रकारही कोरोनाच्या विळख्यात सापडले . अनेकांनी आपला जीवही गमावला . यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा देण्यात यावा, अशा आशयाचे पत्र गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. तसेच, महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनीही पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. आता, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही एक कार्टुन शेअर करत, पत्रकार हे फ्रन्टलाईन वर्करच आहेत, असे म्हटले आहे.

संजय राऊत यांनी कार्टुनिस्ट सतिश आचार्य याचं कार्टुन शेअर केलं आहे. या कार्टुनमध्ये आत्तापर्यंत 235 पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय. तसेच, मी ही बातमी पूर्ण करूच शकत नाही, कारण बातमी लिहून पूर्ण होईपर्यंत मृत्यूचा आकडा बदललेला असतो, असा मार्मिक टोलाही या चित्रातून लगावण्यात आलाय.

कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रातील पत्रकार समाज जागृतीचे काम करत आहेत. सातत्याने सरकार करत असलेले प्रयत्नदेखील ते समोर आणत आहेत. ज्या चुकीच्या गोष्टी घडतात त्यावर अंकुश ठेवण्याचे कामही ते करत आहेत. त्यासाठी त्यांना बाहेर फिरावे लागते. अनेक ठिकाणी जावे लागते. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना आपण फिरण्याची मुभा दिली आहे; मात्र त्यांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे सर्वच पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा द्यावा, अशी मागणी गृहमंत्र्यांनी आपल्या पत्रात केली आहे. आता, संजय राऊत यांनीही ट्विटरवरुन मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मेन्शन करत पत्रकारांचा मुद्दा उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button