संजय राठोड यांचे स्पष्टीकरण थोतांड; सीबीआय चौकशी करा – प्रसाद लाड

Prasad Lad - Uddhav Thackeray

मुंबई : पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या प्रकरणात संशयित असलेले शिवसेनेचे नेते, वनमंत्री संजय राठोड घटनेनंतर १५ दिवसांनी आज पोहरादेवी येथे लोकांसमोर आले. घटना घडल्यापासून ते अज्ञातवासात गेले होते. आपली बाजू मांडताना ते म्हणालेत, चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल, मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

ऑडिओ क्लिपमुळे संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात आले आहे. भाजपाने जाहीरपणे संजय राठोड यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून मागणी केली आहे.

संजय राठोड यांचे आजचे स्पष्टीकरण नसून थोतांड आहे. ज्या पक्षाचे ते मंत्री आहेत त्याच पक्षाचे सरकार असल्यामुळे निष्पक्ष चौकशी होईल ही अपेक्षा ठेवावी तरी कशी? संजय राठोड निर्दोष असतील तर त्यांनी सीबीआय चौकशीला सामोरे जावे, असे ट्विट लाड यांनी केले.

बीडच्या पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणात संशयित असलेल्या संजय राठोड यांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी सीबीआय चौकशीचे आदेश त्वरित देऊन न्याय करावा, हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विनंती!!” असे दुसरे ट्विट लाड यांनी केले.

मंत्रीपदाचा गैरवापर करून समाजातील लोकांना आकर्षित करणे, लोकांना फसवणे हा संजय राठोड यांनी धंदा बनवून ठेवला आहे. जनतेला सर्व काही समजते. तुम्ही गुन्हा केला नव्हता तर १५ दिवस बिळात लपून का बसला होता? हा प्रश्न जनता व आम्ही विचारत आहोत. बिळातून बाहेर आलेला हा नागोबा आहे, या नागोबाचं डोक ठेचल्याशिवाय भाजपा गप्प बसणार नाही, असा इशाराप्रसाद लाड यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांना वाटत असेल की माझा मंत्री हा धुतलेल्या तांदळासारखा स्वच्छ आहे. तर त्यांनी ही चौकशी सीबीआयकडे द्यावी, अशी माझी व महाराष्ट्रातील जनतेची स्पष्ट मागणी आहे. सीबीआय चौकशीतून सत्य बाहेर येईल आणि संजय राठोड जे मंत्री म्हणून मिरवत आहेत, त्यांचा प्रथम राजीनामा घ्यावा नि:पक्षपाती चौकशी करावी.” असे ते म्हणालेत.

बीडच्या पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्याप्रकरणी संशयित असलेले वनमंत्री संजय राठोड हे आज प्रसारमाध्यमांसमोर बोलत असताना, चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल, असं वारंवार सांगत होते. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे असेही ते सांगत होते. मात्र आज ज्या पद्धतीने त्यांनी शक्तीप्रदर्शन करून पोहरा देवीचं दर्शन घेतले. त्या पद्धतीने निष्पक्ष नक्कीच चौकशी होणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी, ही विनंती, असे लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER