संजय राठोडांचे लवकरच पुनर्वसन? शिवसेनेत हालचालींना वेग

Sanjay Rathore

मुंबई : पुण्यातील पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर वनमंत्रीपदाचा राजीनामा दिलेले शिवसेनेचे नेते संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्या पुनर्वसनासाठी शिवसेनेकडून हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बीड जिल्ह्याच्या परळी येथील पुजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारीला पुण्याच्या वानवाडी परिसरात आत्महत्या केली होती. या घटनेला माजी वनमंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरण्यात आले. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली. त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) घेतला. आता राठोडांचे पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

पुजा चव्हाणच्या मृत्यूनंतर संजय राठोड एकदम गायब झाले होते. त्यामुळे त्यांच्यावरील आरोपांची धार विरोधकांनी तीव्र केली. दरम्यान, विरोधकांची आक्रमक भूमिका बघता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला. त्यानंतरही ५ दिवस त्यांनी तो राजीनामा राज्यपालांकडे मंजुरीकरिता पाठवण्यात आलेला नव्हता. परिस्थिती काहीच नियंत्रणात येत नसल्याचे बघून अखेरीस त्यांनी राजीनामा राज्यपालांकडे पाठवला. राज्यपालांनी पाचच मिनिटांत तो मंजूर केला. येवढ्या घडामोडींनतरही संजय राठोडांचे पुनर्वसन होईल, असा विश्‍वास त्यांच्या समर्थकांना होता व आजही आहे. संजय राठोड यांच्या गोटातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पुनर्वसनाच्या हालचाली मुंबईत सुरू झाल्या आहेत आणि येत्या काही दिवसांतच त्यांचे पुनर्वसन होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER