संजय राठोड गायब नाहीत, ते आमच्या संपर्कात; अजित पवारांचा खुलासा

मुंबई : वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) गायब नाहीत, ते आमच्या संपर्कात आहेत, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संजय राठोड गैरहजर होते. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले की, पूजाच्या वडिलांनीही याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे, अजून एक दोघांना ताब्यात घेतलं जात आहे. पोलीस काम करत आहेत. मोठ्या व्यक्तीचं नाव आलं की वेगळी प्रसिद्धी मिळत असते, पण आमचा अंदाज आहे, चौकशीनंतरच सत्य येईल, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे ही वस्तुस्थिती आहे. यापूर्वी धनंजय मुंडेंबाबतीत असंच घडलं, आरोप झाल्यावर राजीनामा घेतला असता तर त्यांची स्वत:ची बदनामी झाली असती. नंतर आरोप करणाऱ्या व्यक्तीने तक्रार मागे घेतली, असं म्हणत अजित पवार यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली.

या प्रकरणात कोणाची पाठराखण करण्याचा प्रश्न नाही. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत एखाद्याला दोषी धरायचं किंवा पदावरून हटवायचं हे कितपत योग्य आहे, हा विचार करण्याजोगा भाग आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. अर्थात ते शिवसेनेचे नेते आहेत. त्याबद्दल शिवसेनाच भूमिका घेईल. माझं स्वत: एकचं त्रयस्त म्हणून मत आहे. जोपर्यंत चौकशीच्या बाबतीत अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत थोडा संयम ठेवा, असा सल्लाही अजित पवारांनी मीडियाला दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER