तब्बल 15 दिवसांनंतर संजय राठोड माध्यमांसमोर येणार, उद्या पोहरादेवीला पोहचणार

Sanjay Rathod

वाशीम : महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी अडचणीत सापडलेले संजय राठोड उद्या ( मंगळवार)ला पोहरादेवीला जाणार असल्याची अधिकृत माहिती प्रशासनाने दिली आहे. .वन, भूकंप आणि पुनर्वसन मंत्री संजय राठोड हे 23 फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. 23 फेब्रुवारी रोजी 11.30 वाजता श्रीक्षेत्र पोहरागड (ता. मानोरा) येथे त्यांचे आगमन होणार असून, दुपारी 1 वाजता धामणगाव देव (ता. दारव्हा)कडे प्रयाण करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेले संजय राठोड पहिल्यांदाच सर्वांसमोर येणार आहेत. जवळपास 15 दिवसांनंतर संजय राठोड मीडियासमोर येणार आहेत. सध्या संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरादेवी येथे जय्यत तयारी सुरू आहे. पूजा आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर संजय राठोड मंगळवारीच पोहरादेवी इथं सर्वांसमोर येतील. राठोड शक्तिप्रदर्शन करून नेतृत्वावर दबाव आणतील, अशीही चर्चा आहे. मात्र पोलिसांनी पोहरादेवी संस्थानला एक नोटीस बजावली असून, फक्त 50 लोकांनाच कार्यक्रमावेळी हजर राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पोहरादेवीत राठोड आपली भूमिका कशा प्रकारे स्पष्ट करतात आणि नोटीस बजावल्याप्रमाणे फक्त 50 जण उपस्थित राहतात, बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी इथं बांजरा गर्दी करणार हे राठोड आल्यावरच कळणार आहे.

कोरोनाचा संसंर्ग वाढत असल्याने जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर संजय राठोड समर्थक मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल करत आहेत. त्यामुळं पोहरादेवी येथे गर्दी होऊ नये म्हणून मानोरा पोलिसांनी बजावलेली नोटीस बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांना मिळाली आहे. यासंदर्भात आम्ही चर्चा करून बंजारा समाजाला आवाहन करणार असल्याचे महंत सुनील महाराज यांनी सांगितले.

दरम्यान, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज हे संजय राठोड यांच्या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र महाराज कर्नाटकमध्ये असून ते उद्या पोहरादेवी येथे हजर राहणार आहेत, अशी माहिती महंत सुनील महाराज यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER