
मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्याप्रकरणात नाव आल्यानंतर शिवसेनेचे (Shiv Sena) नेते आणि तत्कालीन वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी (४ मार्च) राजीनाम्यावर स्वाक्षरी करून संजय राठोडांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्बत केले. त्यानंतर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मंजूर केला. दरम्यान राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाली आहे.
संजय राठोड यांनी रविवारी (२८ फेब्रुवारी) राजीनामा दिला होता. मात्र तो अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर आली होती. तीन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न विरोधकांनी कालपासून उपस्थित केला होता. राजीनामा देण्याआधी पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर राजीनाम्याचा स्वीकार करावा, अशी विनंती संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मंत्रिपद टिकावं म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. त्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राठोडांच्या राजीनाम्यावर स्वाक्षरी केली. त्यानंतर पुढच्या कार्यवाहीसाठी राठोडांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता. आणि राज्यपालांनी त्यांचा राजीनामा तत्काळ मंजूर केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला