राऊडी राठोड 2 बनवण्याचा संजय लीला भंसालीचा विचार

Sanjay Leela Bhansali - Rowdy Rathore

बॉलिवूडमध्ये (Bollywood) सिक्वेल बनवण्याची तशी फार मोठी परंपरा नाही. मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) गुप्तहेर असलेला चित्रपट सुरक्षा सुपरहिट झाल्यानंतर त्याचा सिक्वेल ‘वारदात’ नावाने काढण्यात आला होता. परंतु तो चालला नव्हता. त्यानंतर श्रीदेवीच्या सुपरहिट ‘नगिना’ चित्रपटानंतर ‘निगाहे’ चित्रपट तयार करण्यात आला होता परंतु तोसुद्धा चालला नव्हता. दिग्दर्शक रोहित शेट्टीने मात्र ‘सिंघम’चे दोन भाग काढल्यानंतर ‘सिंघम’च्या इन्स्पेक्टरला नवे रुप देत ‘सिंबा’ची निर्मिती केली होती आणि आता अक्षयकुमारला इन्स्पेक्टर बनवून ‘सूर्यवंशी’ही तयार केला आहे. सलमानच्या दबंगचेही दोन भाग तयार करण्यात आले होते.

याची आठवण आज काढण्याचे कारण म्हणजे प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांनी आठ वर्षापूर्वी म्हणजे 2012 मध्ये अक्षयकुमारला (Akshay Kumar) घेऊन तयार केलेल्या राऊडी राठोड चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी सुरु असल्याचे सांगितले जात आहे. प्रभुदेवा द्वारा दिग्दर्शित हा चित्रपट 2006 मध्ये रिलीज झालेल्या तेलुगु चित्रपट ‘विक्रमारकुडु’ ची अधिकृत हिंदी रिमेक होती. अक्षय कुमारची दुहेरी भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड चालला होता. सोनाक्षी सिन्हाने अक्षयच्या नायिकेची भूमिका या चित्रपटात साकारली होती. अक्षयच्या या चित्रपटातील इन्स्पेक्टरला नव्या कथेत पुन्हा आणण्याचा विचार लगेचच सुरु करण्यात आला होता. परंतु चांगली कथा न मिळाल्याने तो प्रोजेक्ट मागे पडला होता.

परंतु आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय लीला भंसाली राऊडी राठोडचा पुढील भाग तयार करण्याची योजना आखत आहे. गेल्या काही महिन्यांपासून राऊडी राठोडसाठी कथानकाचा शोध सुरु होता. ते कथानक आता मिळाल्याचे म्हटले जात आहे. दिग्दर्शक प्रभुदेवानेही मागे राऊडी राठोडच्या (Rowdy Rathore) सिक्वेलबाबत बोलताना सांगितले होते, आम्ही सिक्वेल केवळ बनवायचा म्हणून बनवणार नाही तर चांगली कथा आणि अक्षयकुमारनेच भूमिका केली तरच आम्ही सिक्वेल तयार करू. अक्षयने संजय लीला भंसाळीला राऊडी राठोडच्या सिक्वेलसाठी होकार दिला असून कथानक मिळाल्यानंतर चित्रपट सुरु करू असे म्हटल्याचेही संजय लीला भंसाळीच्या जवऴच्या सूत्रांनी सांगितले.

बॉलिवूडमध्ये राऊडी राठोड 2 बनण्याची शक्यता नसल्याचे काही जणांचे म्हटले असले तरी संजय लीला भंसाळी पुढील वर्षी डिसेंबरमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER