संजय लीला भंसाळीचा ‘गंगुबाई काठियावाडी’ वादात, नाव बदलावे लागण्याची शक्यता

संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali) आणि त्याचे सिनेमे नेहमीच वाद निर्माण करीत असतात. आलिया भट्ट (Alia Bhatt) अभिनीत त्याचा ‘गंगुबाई काठियावाडी’विरोधात (Gangubai Kathiawadi) कामाठीपुऱ्यातील संस्थेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे आम्ही तुम्हाला सांगितले होतेच. या सिनेमात कामाठीपुऱ्याची बदनामी होत असल्याचा दावा या संस्थेने केला आहे. मात्र आता काँग्रेसच्या एका आमदाराने तर चक्क विधानसभेत या सिनेमाविरोधात आघाडी उघडली असून त्यांनी तर या सिनेमाचे नावच बदलावे अशी मागणी केली आहे.

सजंय लीला भंसाळीने 2013 मध्ये ‘राम लीला’ नावाने एका सिनेमाला सुरुवात केली होती. पण काही लोकांनी सिनेमाच्या नावावर आक्षेप घेतला आणि विरोध केला तेव्हा संजय लीला भंसाळीने सिनेमाचे नाव ‘गोलियों की रासलीला राम लीला’ असे केले आणि सिनेमा रिलीज केला. त्यानंतर 2018 मध्ये संजय लीला भंसाळीने ‘पद्मावत’ सिनेमा प्रेक्षकांसमोर आणला होता. या सिनेमाचे मूळ नाव ‘पद्मावती’ होते. या नावामुळे राजपूत स्त्रियांचा अपमान होत असल्याचा कारणावरून या सिनेमाविरोधात राजस्थानी समुदायाने आघाडी उघडली होती. हा सिनेमा रिलीजच होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला होता. लोकांचा विरोध पाहून अखेर संजय लीला भंसाळीने सिनेमाचे नाव ‘पद्मावती’वरून ‘पद्मावत’ केले आणि सिनेमा रिलीज केला. सिनेमा चांगला असल्याने बॉक्स ऑफिसवर चालला. वादामुळे सिनेमाचा प्रचार प्रचंड झाल्याने त्याचाही फायदा सिनेमाला मिळाल्याचे बोलले जात आहे. आणि आता ‘गंगुबाई काठियावाड’चे नाव बदलण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी सिनेमाच्या नावाला आक्षेप घेतला आहे. अमीन पटेल यांनी, ‘गंगूबाई काठियावाडी’ नावामुळे काठियावाड शहराचे नाव बदनाम होत असल्याचे म्हटले. संजय लीला भंसाळीच्या या सिनेमात कामाठीपुऱ्यातील महिला डॉन गंगूबाई काठियावाडीची कथा मांडली आहे. ही कथा 60 च्या दशकातील सत्य घटनेवर आधारित आहे. अमीन पटेल यांनी सांगितले, कामाठीपुरा आता खूपच बदललेला आहे. आता तेथे 50-60 च्या दशकासारखी परिस्थिती नाही. येथे आता अनेक चांगले उद्योगधंगे सुरु झालेले आहेत. सिनेमाच्या नावात असलेल्या काठियावाड शब्दामुळे काठियावाड शहराचे नाव बदनाम होत असल्याने हे नाव लगेचच बदलले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. विधिमंडळात हा मुद्दा उचललेला असल्याने संजय लीला भंसाळी आता यावर काय पाऊल उचलतात ते पाहाणे मनोरंजक ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER