राज्याचे मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांनी स्वीकारला पदभार

मुंबई :- राज्याचे मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांनी आज सूत्रे हातात घेतली. मावळते मुख्य सचिव म्हणून अजोय मेहता यांचा आज मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. नवे मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांच्या नियुक्तीचा आदेश गेल्या आठवड्यातच जारी करण्यात आला होता. त्यानंतर आज संजय कुमार यांनी पदाची सूत्रे हाती घेतली आहे.

संजय कुमार यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांच्याकडील गृहनिर्माण विभागाचा अतिरिक्त कार्यभार एस.व्ही.आर. श्रीनिवास, यांच्याकडे व गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभार सीताराम कुंटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्त झालेल्या संजय कुमार यांनी अजोय मेहता यांच्याकडून आज पदभार स्वीकारला, यावेळी विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांनी उपस्थित राहून नवनियुक्त मुख्य सचिवांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहता हे विश्वासू मानले जातात. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.  कोविडच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील, असे मुख्यमंत्री सचिवालययाने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER