संजय गुप्ता आता तयार करणार शूटआऊट सीरीजचा तिसरा भाग

Sanjay Gupta will now make the third part of the shootout series

प्रेक्षकांना अंडरवर्ल्डवर आधारित सिनेमे खूप आवडतात. त्यामुळेच रामगोपाल वर्मा, (Ramgopal Varma) संजय गुप्तासारखे (Sanjay Gupta) निर्माते-दिग्दर्शक याच विषयावर सतत सिनेमे तयार करीत असतात. संजय गुप्ताने मुंबईच्या अंडरवर्ल्डवर आधारित मुंबई सागा सिनेमा तयार केला होता आणि तो नुकताच रिलीजही केला. कोरोनाचे संकट असतानाही या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संजय गुप्ताने आता अंडरवर्ल्डवर आधारित अजून एक सिनेमा तयार करण्याचे ठरवले आहे. मात्र हा सिनेमा त्याच्या शूटआऊट सीरीजमधील असणार आहे.

संजय गुप्ताने २००७ मध्ये ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’ (Shootout at Lokhandwala) सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर केला होता. या सिनेमात विवेक ओबेरॉय, तुषार कपूर, सुनील शेट्टी, अमिताभ बच्चन यांनी भूमिका साकारल्या होत्या. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. यानंतर ६ वर्षांनी २०१३ मध्ये संजय गुप्ताने पुन्हा शूटआऊट सीरीजचा दुसरा भाग ‘शूटआऊट अॅट वडाळा’ (Shootout at Wadala) ची निर्मिती केली होती. या सिनेमात जॉन अब्राहम, कंगना रनौत, तुषार कपूर, अनिल कपूर यांच्या भूमिका होत्या. हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. आता ८ वर्षानंतर पुन्हा एकदा संजय गुप्ताने शूटआऊट सीरीजमधील तीसरा भाग तयार करण्याची योजना आखली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा सिनेमा १९९२ मध्ये मुंबईतील जेजे हॉस्पिटमध्ये (J J Hospital) झालेल्या शूटआऊटवर आधारित आहे. हे शूटआऊट दाउद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि अरुण गवळी (Arun Gawli) यांच्या गँगमध्ये झाले होते. २६ जुलै १९९२ ला गवळीच्या माणसांनी दाऊदची बहिण हसीना पारकरच्या पतीची इब्राहिमची हत्या केली होती. या हत्येत सहभागी असलेले अरुण गवळीच्या गँगचे दोन सदस्य बिपीन शेरे आणि शेैलेश हळदणकर यांना जेजे हॉस्पिटमध्ये दोन वेगवेगळ्या मजल्यांवर ठेवण्यात आले होते. या दोघांना मारण्यासाठी दाऊदची माणसे अत्याधुनिक शस्त्रांसह रात्री ३.३० च्या आसपास हॉस्पिटलमध्ये घुसली होती. यापैकी दोघांनी बुलेट प्रूफ जॅकेट घातली होती. या फायरिंगध्ये दोन पोलिसांचा मृत्यू झाला होता तर एक पोलीस जखमी झाला होता. दाऊद गँगची ४ माणसे यात जखमी झाली होती. या शूटआऊटप्रकरणी एकूण २४ लोकांवर खटला दाखल करण्यात आला होता. या सिनेमाचे तात्पुरते नाव ‘शूटआउट ३- गँग वॉर्स ऑफ बॉम्बे’ असे ठेवण्यात आले आहे. संजय गुप्ता सध्या रजत अरोरासोबत स्क्रिप्टवर काम करीत असून स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर कलाकारांची निवड केली जाणार आहे. याचवर्षी हा सिनेमा फ्लोअरवर जाणार असून पुढील वर्षी मार्चमध्ये सिनेमा रिलीज करण्याची योजना संजय गुप्ताने आखली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER