भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी संजय धोत्रेंचं नावं आघाडीवर

अकोला : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि विवादित वक्तव्य करणारे रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील काही अतिकार्यक्षम तर काही अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू दिला जाईल अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरु झाली आहे. तर दानवे यांना पर्याय म्हणून अकोला लोकसभा क्षेत्राचे खास. संजय धोत्रे यांच नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे.

रावसाहेब दानवे हे भाजपचे वरिष्ठ नेते म्हणून नावरुपास आहेत. मात्र दानवेंनी वेळोवेळी वादग्रस्त विधानं करुन पक्षालाच कोंडीत आणलं. शिवाय निर्णय प्रक्रियेत मुख्यमंत्र्यांचं डॉमिनेशन पाहता दानवे काय करतात? असा प्रश्न आहे. रावसाहेब दानवे यांच्याकडून पक्षाचं काम वाढवून सरकारचं काम सोपं करावं अशी अपेक्षा होती. पण त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सरकारला यांच्या बचावासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे दानवेंचा पर्याय शोधण्याची तयारी केंद्रीय नेतृत्वानं केल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय नेतृत्वानं या संभाव्य नावांमध्ये अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचं नावसर्वात वर ठेवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. खासदार संजय धोत्रेंनी सलग तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून विजय नोंदवला आहे. तीनही वेळा त्यांनी भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला.

रावसाहेब दानवे यांची उचलबांगडी केल्यास राज्याची धुरा मराठा, ओबीसी समाजातील नेतृत्वाकडे देण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरु आहेत. प्रदेशाध्यक्षपदासाठी मराठा, ओबीसी नेतृत्वाची चाचपणी केंद्रीय नेतृत्वाकडून सुरू आहे. त्याच अनुषंगानं प्रदेशाध्यक्ष पदासाठी खासदार संजय धोत्रे यांचे नाव चर्चेत आहे.

धोत्रे यांच्या नेतृत्वात भाजपनं अकोल्यात विधानसभा, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत मोठी मुसंडी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू सहकारी म्हणून खासदार संजय धोत्रे यांची राजकीय जगतात चांगलीच ओळख आहे.