हा विजय माझ्या मुलासाठी- सानिया मिर्झा

Sania Mirza

फक्त एकाच निकालावर तुम्ही कुणाचे मुल्यमापन करु शकत नाही. विजयाचा, यशाचा आनंद असतोच. यापेक्षा अधिक चांगल्या पुनरागमनाची आशा केली नव्हती, होबार्टमधील हे यश खासच आहे आणि माझे हे अजिंक्यपद माझा मुलगा ‘इझान’ ला समर्पित आहे, असे आई बनल्यानंतरच्या पुनरागमनात पहिलीच स्पर्धा जिंकणाऱ्या सानिया मिर्झाने म्हटले आहे.

सहा वेळची ग्रँड स्लॅम विजेती असलेल्या सानियाने शनिवारी युक्रेनच्या नादिया किचेनोकच्या जोडीने होबार्ट इंटरनॅशनल च्या महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. ऑक्टोबर 2017 नंतर सानिया ही पहिलीच स्पर्धा खेळली.

प्रज्नेश ग्रँड स्लॅम विजयाचे खाते खोलणार का?

त्याबद्दल ही 33 वर्षीय खेळाडू म्हणाली की, अडीच वर्षाच्या खंडानंतर पुन्हा खेळताना कोणत्याही अपेक्षा नव्हत्या त्यामुळे दडपणही नव्हते. फक्त जाऊन तेथे खेळाचा आनंद घ्यायचा होता. मात्र सुदैवाने सर्व गोष्टी मनाजोग्या घडून आल्या आणि नादियासोबत विजयी सुरूवात झाली ही चांगली गोष्ट झाली.

सानियाचे हे दुहेरीतील एकूण 42 वे आणि जानेवारी 2017 नंतरचे पहिलेच अजिंक्यपद होते. तिच्यामते या स्पर्धेच्या पहिल्या फेरीचा सामना सर्वात कठीण होता. अडीच वर्षानंतर हा पहिलाच सामना होता म्हणून काहीशी अस्वस्थता होती. भावना आणि मैदानावरच्या वावराकडे सर्व लक्ष होते.

पुनरागमन चांगले झाले ही समाधानाची बाब असली तरी एकाच यशाने मुल्यमापन होऊ शकत नाही. करू पण नये. किमान दोन महिने सतत खेळल्यानंतरच कळेल की कितपत तयारी झाली आहे आणि आणखी काय करायला पाहिजे. प्रत्येक सामन्यागणिक मी आढावा घेत राहणार आहे असे सानियाने म्हटले आहे.