संगोळी रायण्णा… भारताचा पहिला क्रांतीवीर

Sangoli Rayanna

भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा १८५७ला लढला गेला पण याच्या ३३ वर्षांआधी इंग्रजांचे मनसुबे ओळखून त्यांना भारतातून हकलून लावण्याचा प्रण एका योद्ध्याने केला होता. त्यांच नाव होतं संगोळी रायण्णा (Sangoli Rayann). कित्तूर राज्याचा सरसेनापती. धनगर/ कुरबा कुटुंबात जन्मलेल्या रायाण्णांच्या महापराक्रमाचे आजही कर्नाटकात पोवाडे गायले जातात.  देशासाठी बलिदान दिलेल्या या महानक्रांतीवीराची आज पुण्यतिथी.

१५ ऑगस्ट १७९८चा जन्म आणि २६ जानेवारी १८३१ला मृत्यू. एखाद्या क्रांतीकाऱ्याचा जन्म आणि मृत्यू आजच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासतल्या दोन मोठ्या तारखा आहेत. हा निव्वळ योगायोग समजता येणार नाही. लहानपणापासून काटक आणि धाडसी असणाऱ्या रायण्णांच्या गुणाचा वापर इंग्रजांशी लढताना झाला.

कित्तूर राज्याचे होते सरसेनापती

कर्नाटकची राणी लक्ष्मीबाई म्हणून राणी चेन्नम्मा सर्वभारतात परिचीत आहेत. त्यांचा जन्म २३ ऑक्टोबर १७७८ला बेळगावच्या ककातीमध्ये झाला. त्याचं लग्न कित्तूरच्या मल्लासर्जा राजाशी झालं. त्या कित्तूरच्या राणी बनल्या.  १८२४ला त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यांनी शिवलिंगाप्पाला दत्तक घेतलं. तोवर राजाचा मृत्यू झाला. आणि इंग्रजांनी याचा फायदा उचलाचं ठरवलं. शिवलिंग्गाप्पाला वारस मानण्यास इंग्रजांनी नकार दिला. एका पाठोपाठ एक भारतातली राज्य गिळायला इंग्रजांनी सुरुवात केली होती. त्यांचा डोळा आता कित्तूरवर होता.

इंग्रजांनी वीस हजार फौज, ४०० बंदूका घेवून कित्तूरवर चाल केली. सकाळी युद्धाला सुरुवात केली तर संध्याकाळी कित्तूर हातात येईल असा त्यांचा समज होता. इंग्रजांचा मनसूबा उधळला संगोळी रायण्णानं. कित्तूरच्या सरसेनापतीनं.

संगोळी रायण्णा

इंग्रजांपुढं टिकाव धरेल इतकी फौज नव्हती. त्यांनी सामान्य प्रजेच्या मनात राष्ट्रभावना जागवली. माय भूमीसाठी लढायची प्रेरणा दिली. प्रजा हातात वीळा, खुरपं, कोयता घेवून रणांगणात उतरली. संख्येनं कमी असलेल्या सैन्याचं नेतृत्त्व करणाऱ्या रायण्णाने गमिनी काव्याचा वापर केला. इंग्रज सैन्याला एकानंतर एक तडाखे दिले. कित्तूरमध्ये आपला पराभव होईल. आपल्याला भारत सोडावा लागेल. इंग्रजांच्या मनात धास्ती निर्माण झाली.

ब्रिटिशांची मर्जी असलेले सावकार आणि जमीनदार गरिबांना लुबाडत होते त्यांचे जमिनीची कागदपत्रे जाळून टाकणे अशा प्रकारे संगोळी रायन्नाने सामान्य जनतेला उठाव करण्यास प्रोत्साहित केले. परंतु फितुरी आणि दगा हे भारतासाठी नवीन नाहीत. आपल्याच साथीदाराने दगा केल्याने इंग्रजांनी संगोळी रायन्ना यांना पकडले. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारा एक थोर योद्धा जेरबंद झाला होता.

संगोळी रायन्ना यांना फाशी देण्यात आली तेंव्हा त्यांच्या तोंडी शब्द होते, “या भूमीवर परत एकदा जन्म घेवून ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावणे हीच माझी शेवटची इच्छा आहे!” मरण समोर दिसत असूनही आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा जन्म घेण्याची इच्छा बाळगणारे संगोळी रायन्ना खरोखर थोर क्रांतिकारक होते. १६ डिसेंबर १८३० रोजी रायान्नाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांनतर, बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात नंदगड येथे रायान्ना यांना फाशी देण्यात आले. नंदगड येथे रायान्ना नायकाची समाधी आहे. या समाधीस भेट देण्यास, दर्शन घेण्यास संपूर्ण देशातून विविध जाती-जमातीचे लोक येतात. रायान्ना सारखा शूरवीर पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा, असा नवस नवविवाहित करून त्याचे प्रतिक म्हणून समाधी जवळ असलेल्या वडाच्या झाडावर लहान पाळणे बांधतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER