
सांगली : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला सुरक्षा कक्षाचे नाव बदलण्यात आले आहे. आता या कक्षाचे नाव भरोसा असे करण्यात आले असून या नवीन फलकासहीत कक्षाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.
कौटुंबिक हिंसाचार, विवाहितांचा सासरी होत असलेला छळ, गैरसमजातून तुटणारे संसार पुन्हा जोडले जावेत, असहाय्य जेष्ठ नागरिकांना सेवा, बालकांवरील अत्याचार याविषयी संबधित पिडीतांना न्याय मिळावा, यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र कक्ष आहे. आजपर्यंत्त त्या कक्षाला महिला संरक्षण कक्ष असे नाव होते. ते बदलून आता भरोसा कक्ष, असे नाव झाले आहे. या कक्षाच्या माध्यमातून कौटुंबिक तंटे सोडविण्याचे, वैद्यकीय सेवेविषयीच्या अडचणी, जेष्ठ नागरिकांना भेडसावणार्या समस्या, बालकांवरील अन्याय या विषयी समुपदेशन केले जाते. ज्यांना कायदेशीर मदतीची आवश्यकता आहे, त्यांना ती मिळावी म्हणून प्रयत्न केले जातात. आवश्यकता असल्यास मानसोपचार तज्ञांची मदत घेतली जाते. विशेषतः गैर समजातून किंवा अगदीच किरकोळ कारणावरुन संसार तुटले जावू नयेत, यासाठी अधीक्षक प्रयत्न या कक्षाच्या माध्यमातून केले जातात.