सांगली महापालिका : भाजपने दिला निष्ठावंतांना न्याय

Sangli Mahapalika-BJP

सांगली :महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीत  भाजपचे पाच, काँग्रेसचे (Congress) दोन आणि राष्ट्रवादीचा  (NCP) एक सदस्य निवडायचा होता. त्यासाठी सर्वच पक्षांत मोठी चुरस होती. शुक्रवारी सत्तारूढ भाजपने पाच जागांसाठी निष्ठावंतांनाच न्याय दिला. भाजपने (BJP) सुनंदा राऊत, सविता मदने, पांडुरंग कोरे, अनिता व्हनखंडे, संजय यमगर यांना संधी दिली. विरोधी काँग्रेसने मदनभाऊ गटाच्या करण जामदार व पद्मश्री पाटील यांची, तर राष्ट्रवादीने दिग्विजय सूर्यवंशी यांची वर्णी लावली.

दैनंदिन कारभारात वरचष्मा असलेल्या दिनकर पाटील आणि सुरेश आवटी गटाच्या समर्थकांना संधी न देता धक्का दिल्याची चर्चा आहे. ऑनलाईन महासभेत भाजपचे गटनेते युवराज बावडेकर, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर आणि राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी महापौर गीता सुतार व आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे बंद पाकिटातून नावे दिली. गेल्या दोन-अडीच वर्षांत दिनकर पाटील, सुरेश आवटी गटांचा वरचष्मा होता.

दोघांच्या मुलांना ज्येष्ठांना डावलत स्थायी समितीचे सभापतिपद देण्यात आले होते. त्यामुळे निष्ठावंतांना डावलल्याचा सूर होता. त्यामुळे यावेळी सदस्य निवडीत प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी निष्ठावंतांना संधी देण्याचा निर्णय घेतला. पाटील यांनी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, इनामदार यांच्याशी चर्चा केली होती. काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याशी चर्चा करून करण जामदार आणि पद्मश्री पाटील यांची नावे अंतिम केली.

विशाल पाटील गटाला मात्र डावलण्यात आले. राष्ट्रवादीचे सूर्यवंशी यांची तिसरी टर्म असून, १२ वर्षांनंतर त्यांना सदस्यपदाची पहिल्यांदाच संधी मिळाली. आता जुन्या व नव्या १६ जणांतून सभापती निवडले जातील. समितीत भाजपचे नऊ, काँगेस-राष्ट्रवादीचे सात असे काठावरचे बहुमत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER