मनसे मैदानात : सांगलीत मराठी भाषेच्या सन्मानासाठी कन्नड भाषेतील फलकाविरोधात खळखट्याकचा इशारा

सांगली :- मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या सन्मानार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरणार आहे. जिल्ह्यातील आस्थापनांवरील कन्नड भाषेतील फलक आठ दिवसांत काढून टाकावे, अन्यथा ते फलक महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) मनसे स्टाईलने काढेल, असा इशारा मनसे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिला आहे.

कर्नाटकातील मराठी माणसावर आणि मराठी भाषेवर अन्याय झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रासह सीमा भागात कन्नड शाळा आहेत. त्या आम्हीही बंद करू.  सांगली भागातील कन्नड भाषाही बंद करू, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला. सरकार जरी झोपले असले तरी मनसे इथे मराठी भाषेसाठी रस्त्यावर उतरणार हे कन्नडग्यांनी  विसरू नये, असा सज्जड दम तानाजी सावंत यांनी दिला.

दरम्यान कर्नाटक राज्याला सांगली जिल्ह्याची सीमा लागून आहे. कर्नाटक राज्यात अनेक मराठी भाषिक राहात आहेत. मराठी शाळा असून मराठी भाषेवर प्रेम करणारे लोक आहेत. तेथील मराठी भाषिकांवर आणि मराठी भाषेवर तेथील सरकार दबाव टाकत आहे. कानडी सरकारकडून त्यांची गळचेपी होत आहे. कर्नाटकातील काही जिल्ह्यांत तेथील मराठी शाळा बंद केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER