सांगली जिल्हा बँकेची आयकर विभागाकडून चौकशी

Sangli bank
File Image

सांगली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर केवळ ४ दिवसात जिल्हा बॅंकेमध्ये २१५ कोटी रुपये जमा झाल्यानंतर सांगली जिल्हा बॅंक आयकर विभागाच्या नजरेत आली आहे. आयकर विभागाद्वारे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. आयकर विभागाचे जवळपास सात अधिकारी या बॅंकेच्या शाखांची चौकशी करीत आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या एकूण २१८ शाखा असून, या शाखांमध्ये नोटाबंदीच्या चार दिवसातच २१८ कोटी रुपये जमा झाले तर बॅंकेच्या २९ शाखांमध्ये पहिल्या चार दिवसात १ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली. याआधी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या १९ शाखांची नाबार्डनेही चौकशी केली आहे. तर, सध्या आयकर विभागाकडून २९ शाखांची चौकशी केली जात आहे.

आमच्या बॅंकेचा व्यवहार पूर्णतः पारदर्शक असल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी म्हटले आहे. कोणत्याही खात्यात २ लाखांपेक्षा अधिक रक्कम नाही तसेच आमच्या बॅंकेत बनावट खाती नाहीत तेव्हा या चौकशीतून आमचे निर्दोषत्वच सिद्ध होईल असे पाटील यांनी म्हटले आहे.