सांगलीत कोरोनास्थिती हाताबाहेर

Sangli Coronavirus

सांगली : सांगलीत (Sangli) आजघडीला जिल्ह्यात पाच हजाराहून कोरोनाग्रस्त (Corona) आहेत. त्या तुलनेत जिल्ह्यात एक तृतीयांशसुध्दा बेड नाहीत. जिल्ह्यात शासकीय आणि खासगी मिळून फक्त 1652 बेड आहेत. त्यापैकी 393 बेड हे अतिदक्षता विभागासाठी आहेत. रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बेड नसल्यामुळे 2675 रुग्णांना घरच्या घरी देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.

घरी क्वारंटाईन करण्यात आलेल्या या रुग्णांमुळेच जिल्ह्यात कोरोनाचा आणखी फैलाव होण्याला चालना मिळण्याची शक्यता आहे. कुठे ऑक्सिजन नाही तर कुठे व्हेंटिलेटरचा पत्ता नाही, कुठे आवश्यक सोयीसुविधा नाहीत तर कुठे डॉक्टरांचाच थांगपत्ता नाही, असा सगळा भोंगळ कारभार सांगलीत सुरू आहे.

रुग्णांना रुग्णवाहिका मिळणे दुरापास्त झाले आहे, रुग्णवाहिका मिळाली तरी हॉस्पिटल मिळणे अवघड होवून बसले आहे, हॉस्पिटल मिळाले तर तिथे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा मिळेनाशी झाली आहे. या सगळ्याची गोळाबेरीज करता करता रुग्णाच्या नातेवाईकांचा दिवस-दिवस वाया जात आहे आणि या कालापव्ययामुळे अत्यवस्थ असलेले रुग्ण दगावताना दिसत आहेत. दिवसाला सरासरी 25 ते 30 लोक कोरोनामुळे दगावत आहेत आणि त्यामध्ये वेळेत किंवा आवश्यक ते उपचार न मिळाल्याने दगावणारांची संख्या लक्षणीय आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोनाकहर अधिकाधिक भयावह स्वरूप धारण करताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER