लोकमान्य टिळकांच्या सांगली भेटीची शताब्दी साजरी

लोकमान्य टिळक

सांगली : सनई चौघड्याचे सूर, आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या आणि पंचारतीने औक्षण करत सोमवारी सांगलीकरांनी लोकमान्य टिळकांच्या सांगलीभेटीच्या शताब्दीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे स्वागत केले. लोकमान्य टिळकांचे पणतु आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक, लोकमान्य ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. गिताली टिळक हे आवर्जुन या शोभायात्रेत सहभागी झाले होते.

लोकमान्य टिळक यांच्या सांगली भेटीच्या शताब्दि निमित्त केसरी आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,सांगली केंद्राच्या वतीने ग्रंथदिंडी, शोभायात्रा काढण्यात आली. राजवाडा चौकातून या ग्रंथदिडीची सुरुवात आमदार सुधीर गाडगीळ, महापौर गीता सुतार,डॉ.दीपक टिळक, टिळक विद्यापीठाच्या प्रकुलगुरु गीताली टिळक, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी विद्यापीठाचे सचिव अजित खाडीलकर, वाणिज्य विभागाचे प्राचार्य डॉ.संजय कंदलगांवकर, प्रकुलसचिव अभिजित जोशी, सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे,अरुण दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पारंपारिक खेळ,लेझिम,घुंघर काठी अशा पारंपारिक वाद्यांनी ही शोभायात्रा सजली होती. सायंकाळी पंचागकर्ते दा.क.सोमण यांचे लोकमान्य टिळक आणि त्यांचे खगोलशास्त्रीय ज्योतिष या विषयावर व्या‘यान झाले. यावेळी अध्यक्षस्थानी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी होते. यावेळी महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते झाले.