
कोल्हापूर : फास्ट टॅगमुळे (FASTag) कोल्हापुरात (Kolhapur) किणी टोल नाक्यावर जास्त वेळ घालवावा लागल्याने कवी संदीप खरे (Sandeep Khare) यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोल्हापुरातल्या किणी टोल नाक्यावर आल्यानंतर आपल्या गाडीवरचे फास्ट टॅग स्कॅन झाले नाही. बरेच वेळा हा त्रास होतो. मात्र तरीही टॅग स्कॅन झाला नाही.
त्यामुळे आपल्याला डबल टोल भरावा लागेल, असे तिथल्या एका कर्मचाऱ्याने म्हटले. मात्र फास्ट टॅगमध्ये बॅलन्स आहे. त्यामुळे मी पैसे देणार नाही, म्हणत संदीप खरे यांनी त्यांना टॅग स्कॅन करायला भाग पाडले. यामध्ये त्यांचा तब्बल १० ते १५ मिनिटे वेळ गेला. शिवाय काहींनी त्यांच्यासोबत हुज्जतसुद्धा घातल्याचे संदीप खरे यांनी म्हटले. त्यामुळे संतापलेल्या खरे यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करून या व्यवस्थेत काहीतरी सुधारणा करण्याची गरज असल्याचे म्हटले. शिवाय हा ‘फास्ट टॅग’ नसून ‘स्लो टॅग’ असल्याची टीकासुद्धा त्यांनी केली आहे. मनसे नेत्या रूपाली पाटील यांनीसुद्धा किणी टोल नाक्यावर राडा केला होता.
दोन तास रांगेत उभे राहावे लागल्याने संतापलेल्या रूपाली पाटील यांनी आम्हाला तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ आपण रांगेत उभे ठेवू शकत नाही म्हणत चांगलेच झापले होते. खरं तर प्रत्येकालाच सध्या या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन यावर ठोस अशी उपाययोजना करणे आता गरजेचे बनले आहे.
