नोटिसाला झुगारत संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास, तर अविनाश जाधव यांना अटक

Sandeep Deshpande - Local Travel

मुंबई : सर्वसामान्य लोकांसाठी रेल्वे सेवा सुरु व्हावी, यासाठी सोमवारी मुंबईत मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले. त्यानुसार मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या नोटिसाला झुगारत लोकल ट्रेनने प्रवास केला. तर ठाण्यात मनसे (MNS) जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

ठाणे (Thane) स्टेशनवर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना लोकल प्रवास करण्याआधीच पोलिसांनी अडवलं आणि कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतलं. ठाण्यात पोलिसांचा मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

याशिवाय नवी मुंबईत मनसेचे उपशहराध्यक्ष निलेश वानखेडे (Nilesh Wankhede) यांच्या ऐरोली मनसे विभाग कार्यकर्त्यांनी वाशी ते ठाणे असा लोकल प्रवास पूर्ण केला. यादरम्यान रबाळे पोलिसांनी ऐरोली स्थानकात काही कार्यकर्त्यांना ताब्यात घतलं.

मनसेकडून यापूर्वीच सविनय कायदेभंग आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. यानंतर रेल्वे पोलिसांकडून संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना आंदोलन न करण्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, तरीही संदीप देशपांडे आणि मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वेने प्रवास केला. “सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करा, अशी विनंती अनेक वेळा सरकारला केली होती. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. बसमध्ये कोरोना पसरत नाही, रेल्वेमध्ये पसरतो असा सरकारचा समज झाला असावा. आज आम्ही कायदेभंगाची हाक दिली होती. त्याप्रमाणे आज नाकावर टिच्चून आम्ही हा रेल्वे प्रवास करत आहोत,” अशी प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली. त्यामुळे आता रेल्वे पोलिसांकडून त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे मनसे नेते अविनाश जाधव आणि पोलिसांमध्ये बाचाबाची पाहायला मिळत आहे. अविनाश जाधव यांनी रेल्वे स्थानकावरील पोलिसांना रेल्वे प्रवास करु द्यावा, अशी तीन वेळा विनंती हात जोडून केली. “मला पाच मिनिटं द्या, मी रेल्वेतून प्रवास करतो. त्यानंतर माझ्यावर जो गुन्हा दाखल करायचा तो करा,” अशी विनंती अविनाश जाधव पोलिसांना करत आहे. मात्र पोलिसांकडून त्यांना परवानगी मिळाली नाही.

“वेळ लागेल पण प्रवास होणार…मी रेल्वेतून प्रवास करणार,” असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. जर परवानगी दिली नाही, तर गनिमी काव्याने आंदोलनाचा इशारा जाधव यांनी दिला आहे. या सर्व प्रकारानंतर मनसे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह ६ जणांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं.मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ठिक-ठिकाणच्या रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER