मराठी न बोलणाऱ्या गुजराती दुकानदाराकडून वृद्ध मराठी लेखिकेचा अपमान, मनसेने चोपला

Sandeep Deshpande

मुंबई : गुरुवारी कुलाब्यातील गुजराती असलेल्या महावीर ज्वेलर्सच्या मालकाने मराठमोळ्या लेखिका शोभा देशपांडे (Shobha Deshpande) यांच्याशी मराठी भाषेत बोलण्यास नकार देत असभ्य वर्तन केले होते. त्यानंतर शोभा देशपांडे यांनी दुकानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दुकानदाराच्या आडमुठेपणाविरुद्ध शोभा देशपांडेंनी रात्रभर ठिय्या मांडल्यानंतर सकाळी आंदोलनस्थळी आलेले मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दुकानदाराला चांगलाच चोप दिला.

शोभा देशपांडे या गुरुवारी दुपारी कुलाबा परिसरातील महावीर ज्वेलर्स या ठिकाणी गेल्या होत्या. दुकानातील व्यक्ती त्यांच्याशी हिंदीतून बोलत होते. त्यांनी मराठीतून बोलावं अशी विनंती शोभा देशपांडे यांनी केली. मात्र त्यांनी मराठीत बोलण्यात नकार तर दिलाच शिवाय दागिने देण्यासही नकार दिला. तसंच पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर ढकलून दिलं. ज्वेलर्स दुकानदाराने आपल्यासह मराठी भाषेचाही अपमान केला आहे. त्यामुळे ज्वेलर्स दुकानदारावर जोवर कारवाई होत नाही तोवर रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करण्यास त्यांनी सुरुवात केली.

पोलिसांनी अपमानित केले म्हणून मुंबई पोलीस आयुक्त स्वतः जोपर्यंत येत नाहीत आणि दुकानदार परवाना दाखवत नाही, तोपर्यंत दुकानासमोरुन न हलण्याचा पवित्रा त्यांनी घेतला.

पोलिसांचे म्हणणे ऐकून घेण्यासही त्या तयार नव्हत्या. मराठी एकीकरण समिती संघटनेच्या काही मराठी शिलेदारांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र देशपांडे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या.

यानंतर आज सकाळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आपल्या कार्यकर्त्यांसह देशपांडेंना भेटण्यास पोचले. संदीप देशपांडे यांनीही जो पर्यंत दुकानदार माफी मागणार नाही तोपर्यंत दुकानाबाहेर अन्नपाण्याविना ठिय्या आंदोलन करण्याऱ्या शोभाताई देशपांडे ह्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा पवित्रा घेतला. काही वेळाने ज्वेलर्सचा मालक पोलिसांना घेऊन आल्याने मनसेचे कार्यकर्ते अधिकच संतापले. आधी त्याने माफी मागावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. मात्र ज्वेलर्सचा मालक पुन्हा अरेरावी करू लागला. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. आणि अखेर ज्वेलर्स मालकाने शोभा देशपांडे यांची पाय पकडून माफी मागितली.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, दुकानदाराने माफी मागितली असली तरी, त्याला जोपर्यंत मराठी येणार नाही तोपर्यंत त्याला दुकान उघडू देणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. प्रत्येक दुकानदाराला मराठी आलीच पाहिजे अशी भूमिका राज ठाकरे यांनी यापूर्वीच घेतली आहे. मात्र आता अशा दुकानदारांनावठणीवर आणण्याची वेळ आली आहे. राज ठाकरे जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही मनसे स्टाईलने त्यांना धडा शिकवू, असा इशाराही संदीप देशपांडे यांनी यावेळी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER