चंदन – दाहशामक वर्ण्य वनस्पती !

चंदनाचे  (Sandalwood) सुगंधी खोड अनेकांच्या देवघरात असतेच. चंदन साबण उदबत्ती क्रिमलोशन अत्तर कितीतरी प्रकारे या सुगंधी वनस्पतीचा उपयोग आपण करतो. केवळ छान गंध असतो म्हणून नव्हे तर शरीरात थंडावा निर्माण करण्याच्या गुणामुळे चंदन टिका चंदन लेप स्वरूपात लावल्या जातो. असे हे दाहशामक सुगंधी चंदन आयुर्वेदात अनेक व्याधीमधे औषधी स्वरूपात वापरल्या जाते.

त्वचेची आग होत असेल तर चंदनाचा लेप उपयुक्त ठरतो.

उष्णतेमुळे ताप येत असेल तर चंदनाचा डोक्याला तळपायाला लेप उपयोगी ठरतो.

घामाला दुर्गंध असेल शरीराला घामाचा वास येत असेल तर चंदन स्नानाच्या पाण्यात टाकून स्नान करावे.

अतिघामामुळे उष्णतेमुळे शरीरावर पुरळं येणे खाज येणे किंवा लाल चट्टे येणे अशा तक्रारी होत असतील तर चंदन उगाळून त्याचा लेप उपयुक्त ठरतो.

बऱ्याच जणांना पित्तामुळे अंगावर चट्टे उठतात व त्यात आग होते यावर चंदनाचा लेप उपयोगी ठरतो.

चेहऱ्यावर डाग पडणे, चेहरा काळवंडणे कांतीहीन चेहरा होणे यावर चंदनाचा लेप फायदेशीर ठरतो. चंदन वर्ण्य आहे म्हणजे वर्ण चांगला करणारे असल्याने वर्ण उजळण्याकरीता अनेक प्रसाधनांमधे वापरण्यात येते.

लघवी करतांना जळजळ होत असेल किंवा मूत्र प्रवृत्ती थांबून थांबून होत असेल तर चंदन मुख्य घटक असलेले चंदनासव उपयुक्त आहे.

मायग्रेन मधे शिरःशूल तीव्र स्वरूपात असते. सूर्य किरणांमुळे तीव्रता जास्त वाढते अशावेळी कपाळावर चंदनाचा लेप लावल्यास शिरःशूल कमी होतो.

पित्तशामक रक्त विकार दूर करणारे असल्यामुळे अम्लपित्त, उष्णतेचे विकार तसेच त्वचा विकारांमधे औषधी रुपात वापरण्यात येते.

ज्वर कामला ( कावीळ) छर्दी ( वांती ) यामधे चंदनाचा आभ्यंतर औषधीमधे वापर करण्यात येतो.

वारंवार तहान लागत असेल व पाणी पिऊनही समाधान होत नसेल तर चंदनाचे सरबत फायदेशीर ठरते. तहान शांत करणारे व शरीरात थंडावा आणणारे चंदन उपयोगी आहे.

चंदन हे थंड प्रकृतीचे तसेच चवीला कडू गोड असे असते. कडू असल्यामुळे जंत दूर करणारे आहे. व्रण जखम झाली असल्यास लवकर भरून आणते शिवाय डाग पण राहत नाही.

अति मासिक स्राव श्वेतप्रदर या विकारांमधे चंदन उपयोगी आहे. चंदनाच्या काढ्याने योनी धावन केल्याने योनी दुर्गंध खाज सुटणे या विकारांपासून उपशम मिळतो.

जननेंद्रीयाची स्वच्छता, मांड्यामधील काळेपणा घालविण्याकरीता तसेच दिवसभर जीन्स सारखे जाड व घाम आणणारे वस्त्र घातल्याने येणारा दुर्गंध घालविण्याकरीता चंदन युक्त पाण्याने त्या जागा स्वच्छ धुवाव्यात. केमिकलयुक्त पावडर पावडर इतक्या नाजूक भागावर लावण्यापेक्षा औषधी गुणात्मक सुगंधी चंदन चूर्ण जास्त चांगले आहे.

असे हे चंदन ताप कमी करणारे, त्वचाविकारहर, वर्ण्य, कृमीहर, पित्तशामक, दाहशामक औषध म्हणून प्रसिद्ध आहे. चंदनादि तेल, चंदनासव अशी अनेक औषधी चंदन वापरून केली जातात.

ayurveda

 

 

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER