सनातनचे निर्दोषत्व पुन्हा सिद्ध! – राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस

- भगवा दहशतवादाचे मिथक प्रचारित करणार्‍यांना सणसणीत चपराक

Chetan Rajhans

पणजी : गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) गोवा खंडपीठाने शनिवारी निकाल दिला. सर्व सहाही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. हे सहाही आरोपी सनातन संस्थेशी संबंधित होते. मडगाव येथे १६ ऑक्टोबर २००९ रोजी हा बॉम्बस्फोट झाला होता.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर सनातन संस्थेनं (Sanatan Sanstha) आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे – गोवा उच्च न्यायालयाच्या निकालाने सनातनचे निर्दोषत्त्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून भगवा आतंकवादाचे मिथक प्रचारित करणार्‍यांसाठी ही सणसणीत चपराक आहे, असे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस म्हणालेत.

चेतन राजहंस यांनी सांगितले की, गोव्यातील मडगाव स्फोट प्रकरणी सनातनच्या ६ साधकांना गोवण्याचा प्रयत्न गोव्यातील तत्कालीन काँग्रेस शासनाने केला होता. चार वर्षे अकारण कारावास भोगल्यानंतर सत्र न्यायालयाने सनातनच्या या सर्व साधकांना निर्दोष मुक्त केले होते. याविषयीच्या अपिलावर सुनावणी करतांना शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.

११ वर्षांपूर्वी दिवाळीच्या पूर्वसंध्येला मडगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यात सनातन संस्थेचे मलगोंडा पाटील आणि योगेश नाईक हे साधक मृत्यूमुखी पडले होते. या प्रकरणाचा तपास गोवा पोलिसांकडून (Goa Police) राष्ट्रीय तपास एजन्सीकडे (NIA) होता.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने एकूण १२ दावे न्यायालयात मांडले होते. यापैकी आठ दावे या यंत्रणेला सिद्ध करता आले नाहीत. विनायक तळेकर, विनायक पाटील, धनंजय अष्टेकर, दिलीप माणगावकर, प्रशांत अष्टेकर आणि प्रशांत जुवेकर या आरोपींना दोषमुक्त करण्यात आले आहे. हे सर्व आरोपी सनातन संस्थेशी संबंधित आहेत.

चार फरार

याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने सनातन संस्थेशी संबंधित सारंग कुलकर्णी, जयप्रकाश आण्णा हेगडे, रुद्र पाटील आणि प्रवीण निमकर या अन्य चार आरोपींना फरार घोषित केले आहे.हे चौघे फरार आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकात घडलेल्या अंधश्रद्धा निर्मुलन संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश आणि प्रोफेसर कलबुर्गी यांच्या हत्येशी ही त्यांचा त्यांचा संबंध जोडला जात आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय त्यांचा तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER