‘सॅमसंग’चा चीनमधला प्रस्तावित प्रकल्प येणार उत्तरप्रदेशात

Samsung

लखनौ :- फोननिर्मिती क्षेत्रातील जगभरातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक ‘सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स’ उत्तरप्रदेशमध्ये ५३.६७ बिलियन रुपये म्हणजेच ५ हजार ३६७ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीने उत्तरप्रदेशमध्ये स्मार्टफोन डिस्प्ले बनवण्याचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील करारांवर २०१९ च्या शेवटी सरकार आणि कंपनी दोघांकडूनही स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.

हा प्रकल्प चीनमध्ये प्रस्तावित होता; पण कंपनीला आकर्षक कर सवलती आणि इतर सोयी सुविधा देण्यात आल्याने कंपनीने भारताला पसंती दिल्याचे सांगण्यात येते आहे. या कारखान्यात १३०० कामगारांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे इनव्हेस्ट इंडिया या मोहिमेअंतर्गत केंद्राने उत्तरप्रदेश सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. ‘इनव्हेस्ट इंडिया’ या मध्यस्थी करणाऱ्या आणि परदेशी गुंतवणूक आणण्याचे काम करणाऱ्या खात्याने उत्तरप्रदेश सरकारला पाठवलेल्या सॅमसंगच्या कारखान्यासंदर्भातील पत्राचा हवाला या बातमीत देण्यात आला आहे.

हा प्रकल्प २०२१ पासून सुरू होणार आहे. इनव्हेस्ट इंडियाच्या पत्रात म्हटले आहे की, “आम्ही उत्तरप्रदेशमधील हायटेक उद्योगांच्या स्थापनेस चालना देण्यासाठी आणि मुख्य गुंतवणूकदार म्हणजेच सॅमसंग डिस्प्लेचे कामकाज भारतात सुरू करण्यासाठी देता येतील अशा सोयींसंदर्भात आमच्या शिफारशी सादर करीत आहोत.” २० वर्षांच्या कालावधीत एकूण गुंतवणुकीवर उच्च भांडवली प्रोत्साहन मिळवून सॅमसंगला फायदा होऊ शकेल. या पत्रामधील मुद्द्यांचा विचार केला जात आहे आणि अद्याप यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही, असं उत्तर प्रदेशचे औद्योगिक विकास मंत्री सतीश महाना म्हणाले आहेत.

सॅमसंगने केलेली ही गुंतवणूक भारताला फायद्याची ठरू शकते. त्यातही स्मार्टफोन कंपन्यांना आकर्षित करण्याच्या स्पर्धेमध्ये मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या व्हिएतनामऐवजी सॅमसंगने भारताला प्राधान्य दिल्याने या कराराला विशेष महत्त्व आहे. “सध्या व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि थायलंडसारखा प्रतिस्पर्धी देश भांडवली खर्चावर लक्ष केंद्रित करून कंपन्यांना पॅकेजेस देतात.” असे इनव्हेस्ट इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे.

योग्य वित्तीय आणि बिगर-वित्तीय प्रोत्साहनांद्वारेही अशा गुंतवणुकींना प्रोत्साहन देणे अत्यावश्यक असल्याचेही ते सांगतात. २००९ मध्ये स्थापन केलेला इनव्हेस्ट इंडिया हा भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार मंत्रालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेला इनव्हेस्ट इंडिया हा ना नफा ना तोटा या आधारावर सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे, असं वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वेबसाईटवर म्हटले आहे.

उत्तरप्रदेशात सॅमसंगचा जगातील सर्वांत मोठा स्मार्टफोन उत्पादक प्रकल्प आहे. स्थानिक डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग केल्याने सॅमसंगला आयात तसेच आयातीवरील बचत करण्यामध्ये फायदा होईल. तसेच कंपनीच्या स्मार्टफोन निर्यात क्षमतेस चालना देईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER