समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारांना दंडासह दोन अब्ज ४२ कोटींच्या गैरव्यवहारासाठी नोटिसा

Highway

मुंबई : नागपूर ते मुंबई सर्वात जलद गती मार्ग ज्याला समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. या महामार्गाच्या कामासाठी जालना जिल्ह्य़ातील बदनापूर आणि जालना तालुक्यांमधून अवैधरीत्या मुरुम आणि दगडाचे उत्खनन केल्याबद्दल महामार्गासाठी काम करणा-या कंत्राटदार कंपनीस मूळ रक्कम तसेच त्यावरील दंडासह दोन अब्ज ४२ कोटी २० लाख रुपये भरण्याच्या नोटिसा संबंधित तहसीलदारांनी बजावली आहे. महसूल तसेच गौण खनिज विभागाने केलेल्या तपासणीत अवैधरीत्या मुरूम आणि दगडाचे उत्खनन झाल्याचे समोर आले होते.

मुरुम व दगड इत्यादी गौण खनिजाचे अवैध उत्खनन केल्याचे आढळल्यावर मूळ किंमत आणि त्यावर पाचपट दंड नियमानुसार आकारण्यात येतो. त्यानुसार संबंधित कंत्राटदार कंपनीस नोटीस बजावली आहे. अशी माहिती जालनाचे तहसिलदार श्रीकांत भूजबळ यांनी दिली.

समृद्धी रस्त्याचे काम करणारे कंत्राटदार मोन्टे कार्ला लि. कंपनीस प्रतिब्रास दोन लाख रुपये दंड आकारण्यात आला असून ८७ कोटी रुपये दंड लावण्यात आल्याचे नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. जामवाडी, कडवंची, पानशेंद्रा, थार, वरुड या गावातून गौणखनिज उचण्यात आले आहे. अवैध मुरुम उत्खनन केल्याचा ठपका या कंपनीवर ठेवण्यात आला आहे.

नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग जालना जिल्ह्य़ातील २५ गावांच्या शिवारातून जातो. मागील दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून या महामार्गाचे काम सुरू आहे. गुजरातमधील कंत्राटदार कंपनीकडे हे काम आहे. जालना तालुक्यातील जामवाडी, कडवंची, पानशेंद्रा, थार, वरुड गावांच्या शिवारातून अवैधरीत्या उत्खनन केल्याबद्दल मूळ रक्कम आणि त्यावरील दंडासह एकूण ७९ कोटी २० लाख रुपये शासनाकडे भरण्याची नोटीस तहसीलदारांनी कंत्राटदारास बजावली आहे.

त्याचप्रमाणे बदनापूर तालुक्यातील खादगाव, सोमठाणा भागातून गौण खनिजाचे अवैध उत्खनन केल्याबद्दल मूळ रक्कम आणि त्यावरील दंडासह एक अब्ज ६३ कोटी रुपये भरण्याची नोटीस तेथील तहसीलदारांनी संबंधित कंत्राटदारास बजावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER