वाचा समृद्धीमहामार्गातील ___ लातूर- नांदेड कनेक्शन अन….

राज्य रस्ते विकास महामंडळाचे म्हणजे एमएसआरडीसीचे मुख्यालय सी-लिंक संपल्यानंतर लगेच बांद्राकडे उतरताना डावीकडे आहे. सहज वेळ मिळाला तर चौकस माणसाने सध्या या कार्यालयाला भेट द्यायला हरकत नाही.समृद्धी महामार्गासाठीच्या कंत्राटांसंदर्भात तेथे सध्या अर्थपूर्ण हालचाली सुरू असल्याचे बोलले जाते.

ही बातमी पण वाचा : १७ मीटर उंचीवर होणार स्पॅनचे निर्माण कार्य

या कार्यालयात दोन खाऊबाबा बसलेले आहेत. एक नांदेडचे आहेत तर दुसऱ्याचे कनेक्शन लातूरशी आहे. सध्या हे दोघेच “मिल बाटकर खायेंगे” कार्यक्रमांतर्गत स्वतःची समृद्धी करून घेत आहेत. 2019 मधील लोकसभा निवडणुकीची आर्थिक तजवीज करण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवण्यात आली आहे त्यामुळे आम्हाला हे करावे लागत आहे आमच्याकडे प्रत्येकी सहा लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे ती पूर्ण करायची तर हे सगळे करावेच लागते असे हे खाऊ बाबा जाहीरपणे सांगतात हे सहा मतदारसंघ कोणते? हे दोघे कोणत्या पक्षासंदर्भात असे बोलत आहेत याची माहिती मिळू शकली नाही.

ही बातमी पण वाचा : आता १० राज्यामध्ये होणार बीएसएनएलची ४जी सेवा सुरु

या कार्यालयात गेल्यानंतर कंत्राटदार आणि त्यांच्या पंटरांचे घोळके उभे असलेले दिसतात. एकेकाला आत बोलावून चर्चा केली जाते. “वाटा”घाटी होतात. विद्येचे माहेरघर असे ज्या शहराचे महाराष्ट्रात वर्णन केले जाते त्या शहरातील एक नेता केंद्रामध्ये आहे. त्याचे एक पी ए पाटील हे सध्या एमएसआरडीसीच्या कार्यालयात जवळपास मुक्कामीच असतात. तेथील गेस्ट हाउसमध्ये ते तळ ठोकून बसलेले आहेत. एमएसआरडीसीच्या राज्यमंत्र्यांचे पीए भागवत यांचाही सदर कार्यालयात मुक्त संचार असतो. नांदेड आणि लातूरकरांच्या केबिनमध्ये ते पडीक असतात. पाच बोटात सहा अंगठ्या घातलेल्या कंत्राटदारांची कार्यालय परिसरात चलती दिसते.

समृद्धी महामार्गाचे वेगवेगळे टप्पे करून ती कामे 13- 14 बड्या कंपन्यांना देण्यात आलेली आहेत. विशिष्ट किलोमीटरपर्यंतचे काम विशिष्ट कंपनीला देण्यात आले आहे. एकेका कंपनीने दोन ते साडेतीन हजार कोटीपर्यंत ची कामे घेतलेली आहेत. या अशा प्रकारच्या मोठ्या कंत्राटामध्ये बड्या कंपन्या कंत्राट घेतात आणि त्या मग इतर कंपन्यांना सबलेट करतात. आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम खाते किंवा एमएसआरडीसीच्या माध्यमातून जी कामे होत आली त्यामध्ये राज्य शासन व एमएसआरडीसी/बांधकाम विभाग आणि संबंधित कंपनी यांच्यात करार होत असे.मग मूळ कंपनी त्यातील बरीच कामे सबलेट करायची. बरेचदा मुख्य कंपनी ही सबलेट कंपनीला पैसे देण्यासाठी अडवणूक फसवणूक करायची. या वादात बरेचदा प्रकल्पही राखडायचा.

यावर तोडगा काढण्याचे कारण देत आता एमएसआरडीसी,मुख्य कंपनी आणि सबलेट कंपनी अशा तिघांमध्ये करार करण्याची पद्धत समृद्धी महामार्गात( लातूर- नांदेड कनेक्शनी) आणली गेली आहे. त्यामुळे आपला पैसा अजिबात बुडणार नाही याची सबलेट कंपन्यांना खात्री असल्याने लहानमोठ्या कंत्राटदारांचे हात समृद्धीमध्ये काम मिळवण्यास सळसळत आहेत.अशा कंत्राटदारांची सध्या समृद्धीच्या कार्यालयात गर्दी झालेली दिसते आणि या गर्दीने अर्थपूर्ण हालचालींना वेग दिला आहे.

एमएसआरडीसीचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांना या अर्थपूर्ण हालचालींची कल्पनाही नसावी? त्यांच्या पाठीमागे सर्व काही बिनधास्त चालले आहे. शिंदे साहेब ठाण्याच्या शिवसेनेवर तुमचा जसा धाक आहे तसा धाक एमएसआरटीसीमध्ये तुम्ही निर्माण करावा अशी सक्षम नेता म्हणून तुमच्याकडून अपेक्षा आहे. नाहीतर माल भलतेच खातील आणि बदनाम मात्र तुम्हाला व्हावे लागेल. तुमची चांगली प्रतिमा काही बदलांमुळे मलिन होऊ नये एवढेच मनापासून वाटते.तुमच्या खात्यात हे काय चाललं आहे अशी विचारणा उद्या मातोश्रीवरून झाली तर, “नाय मला काय माहित नाय” असं उत्तर तुम्ही देऊ शकाल काय? मग सांगा! जे काय चाललाय ते तुम्हाला माहिती आहे की माहिती असूनही तुम्ही दुर्लक्ष करताय?