कटिंग चहासाठी समृद्धीने घेतला ब्रेक

ऐन रंगात आलेल्या मालिकेत मुख्य पात्र साकारत असलेली नायिका पडद्यावर दिसायची बंद झाली तर मनात अनेक प्रश्नांचं काहूर उठल्याशिवाय राहणार नाही. अर्थात वैयक्तिक कारणामुळे त्यांना मालिकेतून गायब केलं जातं. त्यासाठी कथेमध्ये असे काही सीन निर्माण केले जातात की ज्यामध्ये नायिका एखाद्या ट्रेनिंगसाठी बाहेर गावी गेली आहे किंवा तिचे अपहरण झाले आहे अनेक पर्याय मालिकेचे लेखक हाताशी धरून ठेवत असतात .असाच एक ब्रेक फुलाला सुगंध मातीचा या मालिकेची नायिका कीर्ती म्हणजेच समृद्धी केळकर (Samruddhi Kelkar) हिला हवा असल्यामुळे या मालिकेत पुढच्या काही भागात समृद्धी या मालिकेत दिसणार नाही आहे. समृद्धी कुठल्याही मोठ्या ट्रीपसाठी परदेशात जाणार नाहीय किंवा स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात अजून तरी तिच्याकडे गुड न्यूज नाही आहे मग समृद्धीला हा ब्रेक कशासाठी हवा आहे या प्रश्नाचं उत्तर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवले आहे. काही वर्षांपूर्वी समृद्धी अभिनीत दोन कटिंग ही शॉर्ट फिल्म रिलीज झाली होती. याच शॉर्टफिल्मचा पुढचा भाग चित्रित होणार असल्याने त्यासाठी समृद्धीने ब्रेक घेतला आहे. चहासाठी माझा ब्रेक असं म्हणत समृद्धीने हे नवे स्टेटस तिच्या सोशल मीडिया पेजवर अपडेट केले आहे. पुढचे काही दिवस समृद्धी या मालिकेच्या स्क्रीन पासून लांब राहणार आहे पण त्याच वेळी ती तिच्या दोन कटिंग या शॉर्टफिल्मच्या चित्रीकरणात व्यस्त असणार आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये अक्षय केळकर हा तिचा सहनायक आहे.

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत समृद्धी केळकर कीर्ती ही व्यक्तिरेखा साकारत आहे.आयुष्यात शिकून कलेक्टर होण्याचे स्वप्न पाहणारी एक मुलगी परिस्थितीच्या अशा काही कचाट्यात अडकते की तिचं लग्न एका आठवी पास असलेल्या मिठाई दुकानदारासोबत होतं. शिक्षण, अभ्यास या व्यतिरिक्त काहीही विचार न करणारी पडद्यावरची कीर्ती लग्नानंतर पुस्तकांपासून, अभ्यासापासून लांब जाते अशी ही भूमिका आहे. किर्तीने तिच्या अभिनयाने या भूमिकेला उत्तम न्याय दिला असून या मालिकेत तिच्या नायकाची म्हणजेच शुभमची व्यक्तिरेखा अभिनेता हर्षद अटकरी हा साकारत आहे. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत असल्याने ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे.

काही दिवसापूर्वी या मालिकेतील जीजी अक्का म्हणजेच अभिनेत्री आदिती देशपांडे या अचानकपणे मालिकेतून गायब झाल्या होत्या. गेल्या वर्षभरात कोरोनाचं संकट आलं आणि त्याच्यानंतर लॉकडाउन आलं. अनलॉकनंतर मालिकांचे चित्रीकरण सुरू झालं मात्र अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्यामुळे मालिकेच्या कथांमध्ये काही बदल करत या कलाकारांना हक्काची विश्रांती देण्यात आली होती. कलाकारांना कोरोना झाला ही गोष्ट कुठेही लपवून न ठेवता मालिकांच्या टीमने केलेले बदल प्रेक्षकांनीही स्वीकारले. आदिती देशपांडे यांनाही करोनाची लागण झाल्यामुळे त्या काही एपिसोडमध्ये प्रेक्षकांना दिसल्या नाहीत. त्यानंतर आता या मालिकेची नायिका समृद्धी केळकर देखील मालिकेतून ब्रेक घेत असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने चाहत्यांना त्यांना असं वाटलं की समृद्धीला ही करोना झाला आहे का ? ही चर्चा वाढतच गेल्यामुळे समृद्धीने या गोष्टीला पूर्णविराम द्यायचा असे ठरवले आणि तिने तिच्या सोशल मीडियापेजवर, या मालिकेतून ब्रेक घेण्याचं खरं कारण सांगितलं. यामुळे विनाकारण होणारी चर्चा थांबली आणि समृद्धी या मालिकेतून काही दिवसांची सुट्टी का घेत आहे या मागचं खरं कारण देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं.

दोन कटिंग ही समृद्धीची शॉर्ट फिल्म एका वेगळ्या विषयावर बेतलेली आहे. एकमेकांशी लग्न करायला तयार नसलेलं एक जोडपं चहाच्या निमित्ताने एकत्र भेटतं आणि त्यांच्यामध्ये विचारांची देवाण-घेवाण होते आणि त्यानंतर ते एकमेकांसाठी किती पूरक आहेत याची जाणीव त्यांना होते म्हणून त्या दोघांच्या नात्यातला तो कटींग चहा त्यांना जवळ आणण्यासाठी पूल ठरतो अशी या शॉर्टफिल्मची कथा आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रतिसादामुळे या शॉर्ट फिल्मचा दुसरा भाग लवकरच रिलीज होणार आहे. समृद्धी आणि अक्षय हीच जोडी पुढच्या भागातही अभिनय करणार असल्याने समृद्धी काही दिवसांसाठी फुलाला सुगंध मातीचा या मालिकेपासून दुरावणार आहे. पण तिच्या चाहत्यांनी तिच्या नव्या कामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेच्या माध्यमातून समृद्धीचे छोट्या पडद्यावर आगमन झालं होतं. त्यापूर्वी तिने काही एकांकिका नाटक यामध्ये अभिनय केला होता. ती उत्तम नृत्य कलाकर असून ढोलकीच्या तालावर या रियालिटी शोमध्येही सहभागी झाली होती.फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चाहते आता तिच्या दोन कटिंग या शॉर्ट फिल्मच्या दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER