‘स्वातंत्र्य चळवळीत तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?’ शिवसेनेची संघ परिवारावर थेट टीका

RSS-Shivsena

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपा-शिवसेना यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला आहे. बुधवारी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानसभेच्या सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडावा अशी मागणी लावून धरली होती. मात्र सत्ताधाऱ्यांनी त्यांची मागणी फेटाळली. याच मुद्द्यावरून शिवसेनेने आजच्या ‘सामना’तील अग्रलेखात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कान टोचले आहे.

वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच; पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता? १९४७ साली स्वातंत्र्यदिनही संघाने मानला नाही व राष्ट्रध्वज तिरंगा संघ मुख्यालयावर फडकवला नाही. काही ठिकाणी तिरंग्याचा घोर अपमान करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व इतिहासात नोंदले गेले आहे, असा टोला शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून संघाला लगावला आहे.

वीर सावरकर हे अंदमानातून सुटल्यावर रत्नागिरीत सामाजिक कार्य करीत राहिले. देशभरातील अनेक प्रमुख लोक त्यांना तेथे येऊन भेटले. त्यात महात्मा गांधींपासून डॉ. हेडगेवारांपर्यंत पुढारी होते. वीर सावरकर आणि डॉ. हेडगेवार यांच्यात जी चर्चा झाली त्याचा तपशील महाराष्ट्रातील ‘नव सावरकर भक्तां’नी तपासून पाहिला पाहिजे. वीर सावरकरांचे कार्य, राजकीय विचार भूमिकांच्या पलीकडचे होते. भारतीय जनता पक्षाला सावरकरांचे विज्ञाननिष्ठ हिंदुत्व, गोमातेसंदर्भातील परखड विचार पेलवणारे आहेत काय? भाजपच्या पुढाऱ्यांनी जाहीर केले आहे की, ‘माझी जन्मठेप’ या आत्मकथेचे आम्ही जाहीर वाचन करू! भाजपला इतके कष्ट घेण्याचे कारण नाही- असा सल्ला शिवसेनेने भाजपलाही दिला.

वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच; पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता? १९४७ साली स्वातंत्र्यदिनही संघाने मानला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरदार पटेल यांनी दोन वेळा बंदी आणली. दोन्ही वेळेला ‘बंदी’ उठवताना सरदारांनी एक अट कायम ठेवली- ती म्हणजे, ‘‘तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज आहे. तो मानावाच लागेल.’’ ही अट गोळवलकर गुरुजींनी मान्य केली; पण २००२ पर्यंत संघाने हा शब्द पाळला नाही, असे ‘रेकॉर्ड’ सांगतेय. राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे देशद्रोही ठरवले जातात. स्वतःस राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्या संघटना २००२ पर्यंत ‘राष्ट्रध्वज’ फडकवायला तयार नव्हत्या. भगवा ध्वज हे शिवसेनेचेही प्रतीक आहे; पण भगव्याच्या बरोबरीने ‘तिरंगा’ही फडकवला जातो हा आपला राष्ट्रवाद आहे, असे म्हणत शिवसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही कान टोचले आहे.

‘वीर सावरकरांवरून शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होईल हा त्यांचा भ्रम’ – शिवसेना