राहुल गांधींचे विश्वासू साथीदार राजीव सातवही गेले ; शिवसेनेची सामनातून श्रद्धांजली

Maharashtra Today

मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) यांचे रविवारी (16 मे) पहाटे कोरोनाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनावर शिवसेनेने(Shivsena) सामनाच्या अग्रलेखातून शोक व्यक्त केला आहे .

आजचा सामनातील अग्रलेख :

राहुल गांधी (Rahul GAndhi)यांच्यावर चौफेर हल्ले होत असताना जे मोजके लोक खंबीरपणे राहुलचे संरक्षक कवच म्हणून उभे राहिले त्यात राजीव सातव

सगळ्यात पुढे होते. राहुल गांधी यांच्या सभोवती जी मोजकी विश्वासाची माणसे आहेत त्यातले महत्त्वाचे विश्वासू साथीदार राजीव सातवही गेले. हे बरे झाले नाही. हे नुकसान महाराष्ट्राचेही आहे. मराठवाड्याची तर हानीच झाली. नेतृत्वाच्या बाबतीत मराठवाड्याला जणू शापच लागला आहे. प्रमोद महाजन , गोपीनाथ मुंडे , विलासराव देशमुख गेले. आता राजीव सातव यांनीही अखेरचे प्रयाण केले. कोरोनाने फारच वाईट दिवस दाखवले. सातव यांच्या जाण्याने ते जास्त जाणवले. महाराष्ट्राच्या या तरुण नेत्यास आमची विनम्र श्रद्धांजली, अशा शब्दात शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून आदरांजली वाहिली .
एक निरागस , सदैव हसतमुख राजकीय चेहऱ्याने कायमचा निरोप घेतला. हे बरे झाले नाही!

कोरोना महामारीमुळे काळ मोठा कठीण आला आहे. रोजच दुःखद बातम्या येत आहेत. ओळखीचे, मित्र परिवारातले, आप्तांचे अचानक सोडून जाणे अस्वस्थ करीत असताना राजीव सातव यांच्या निधनाच्या बातमीने कानात जणू गरम शिसे ओतले गेले आहे. राजीव सातव हे फक्त 47 वर्षांचे जीवन जगले. या अल्प काळात त्यांनी मोठी झेप घेतली, त्यापेक्षा मोठी झेप ते घेऊ शकतील असे त्यांचे व्यक्तिमत्व होते, पण कोरोनाने या तरुण, उमद्या काँग्रेस नेत्याचाही अकाली बळी घेतला. हे दुःख व्यक्त करण्यापलीकडचे आहे. गेल्या 23 दिवसांपासून सातव पुण्याच्या जहांगीर इस्पितळात उपचार घेत होते. सुरुवातीला त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार सुरूच होते, पण पाच दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली. त्यांचा कोरोना रिपोर्टही निगेटिव्ह आला. ते लवकरच इस्पितळातून बाहेर पडतील अशी खूशखबर होती, पण त्यांच्या शरीरात सायटोमेगँलो व्हायरस हा नवाच विषाणू घुसला व त्या सैतानाने महाराष्ट्राचा तरुण-तडफदार नेता आपल्यातून हिरावून नेला. राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेसची हानी झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेने अहमद पटेलांसारखे सोनिया गांधींचे निकटवर्तीय, काँग्रेसचे जाणकार नेते खेचून नेले. दुसऱ्या लाटेने राहुल गांधींचे उजवे हात, काँग्रेसचे तडफदार, चमकदार नेतृत्व राजीव सातव यांना हिरावून नेले. कोरोना रोज नव्या जखमा देत आहे. राजीव सातव यांच्या जाण्याने या जखमांचे घाव अधिक प्रकर्षाने जाणवत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून राजीव सातव हे काँग्रेस वर्तुळात व दिल्लीच्या राजकारणातील एक महत्त्वाचा चेहरा म्हणून मानले जात होते.

मराठवाड्यातील हिंगोलीचा हा तरुण कार्यकर्ता. त्यांच्या मातोश्री रजनी सातव या राजकारणात होत्या. राज्य मंत्रिमंडळातही त्यांनी काम केले. त्यामुळे सातव यांना घरातील राजकारणाचा वारसा होता, हे मानले तरी राजीव यांचा प्रवास हा घराणेशाहीच्या जोरावर नव्हता तर जमिनीवर काम करून, संघर्ष व कष्ट करूनच झाला हे कोणीच नाकारणार नाही. हिंगोलीच्या कळमनुरी पंचायत समितीचे सदस्य ते महाराष्ट्र विधानसभेचे आमदार, लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. सातव हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष होतेच, पण 2010 साली अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांनी त्यांची निवड केली. तेव्हापासून ते काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात वावरत राहिले. काँग्रेस कार्य समितीचेही ते सदस्य होते. महाराष्ट्राचा राजकारणी दिल्लीत रमत नाही हा आक्षेप सातव यांनी खोडून काढला. दिल्लीत ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय झाले. महाराष्ट्रातील मुखदुर्बल काँग्रेस नेत्यांचा ते दिल्लीतील आवाज बनले. राहुल गांधी यांनी अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवल्या. मोदी-शहा यांच्या गुजरात राज्याचे प्रभारी म्हणून त्यांना नेमले. सातव यांनी बेडरपणे गुजरातमध्ये प्रवेश केला. शत्रूच्या गोटात शिरून काँग्रेस पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला.

तरुण नेता असल्याने नव्या कार्यकर्त्यांना त्यांनी आकर्षित केले. राहुल गांधी यांच्यावर चौफेर हल्ले होत असताना जे मोजके लोक खंबीरपणे राहुलचे संरक्षक कवच म्हणून उभे राहिले त्यात राजीव सातव सगळ्यात पुढे होते.

काँग्रेस पक्षाशी त्यांची नाळ घट्ट जोडली होती. काँग्रेसची विचारसरणी व सिद्धांत याबाबत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. काँग्रेस पक्षातील अलीकडच्या छुप्या बंडखोर पुढाऱ्यांनाही त्यांनी अंगावर घ्यायला कमी केले नाही. राजीव वागण्या-बोलण्यात साधे होते, पण गांधी परिवार व काँग्रेसच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होताच ते कमालीचे आक्रमक होत असत. संसदेत त्यांचे हे असे उग्ररूप अनेकदा दिसले. ते मराठवाड्याचे भूमिपुत्र. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. पुण्याच्या ‘आयएलएस’ कॉलेजातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. ते उच्चशिक्षित होते, पण सामान्य कार्यकर्त्यांत सदैव रमले. संघटना बांधणीचे त्यांना वेड होते व आज काँग्रेसला अशाच कार्यकर्त्याची गरज होती. राहुल गांधी यांच्या सभोवती जी मोजकी विश्वासाची माणसे आहेत त्यातले महत्त्वाचे विश्वासू साथीदार राजीव सातवही गेले. हे बरे झाले नाही. हे नुकसान महाराष्ट्राचेही आहे. मराठवाड्याची तर हानीच झाली. नेतृत्वाच्या बाबतीत मराठवाड्याला जणू शापच लागला आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख गेले. आता राजीव सातव यांनीही अखेरचे प्रयाण केले. कोरोनाने फारच वाईट दिवस दाखवले. सातव यांच्या जाण्याने ते जास्त जाणवले. महाराष्ट्राच्या या तरुण नेत्यास आमची विनम्र श्रद्धांजली. एक निरागस, सदैव हसतमुख राजकीय चेहऱ्याने कायमचा निरोप घेतला. हे बरे झाले नाही!, असे शिवसेनेने म्हटले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button