‘लढून मरावं, मरून जगावं’ हेच आम्हाला ठावं’, संभाजीराजेंचे मराठा तरुणांना आवाहन

Maratha Reservation - Sambhaji Raje

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने (SC) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती देत खटला घटनापीठाकडे वर्ग केला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून निराश झालेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. विवेक कल्याण रहाडे असं या १८ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून खासदार संभाजीराजे भोसले (Sambhajiraje Bhosale) यांनी मराठा तरुणांना भावनिक आवाहन केले आहे.

मराठा समाजातील युवकांनी आत्महत्या करू नयेत असं त्यांनी सांगितल असून तुम्हीच जर असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? अशी विचारणाही केली आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीडमधील तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेवर शोक व्यक्त करत संभाजीराजेंनी हे आवाहन केलं आहे.

संभाजीराजे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, विवेक रहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली.

माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत. एक लक्षात ठेवा हा समाज, “लढून मरावं, मरून जगावं” हेच आम्हाला ठावं, असे पोवाडे गाणारा आहे. माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका. आज परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, अंधारात जात असलेली वाटत असली तरी, उद्या नक्की पहाट होईल. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूंच! हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही, असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER