खा. संभाजीराजे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

Sambhajiraj thanked to CM Fadnavis

मुंबई : एमपीएससी राज्यसेवेच्या मुलांना अखेर न्याय मिळवून देण्यात यश आले. सर्व भावी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विशेष आभार मानले. अनेक दिवसांपासून, विशेषतः काल दिवसभर मी स्वतः सर्व विद्यार्थ्यांसोबत या संदर्भात प्रयत्न करत होतो. मंत्रालयामध्ये या विद्यार्थ्यांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणली.

मुख्यमंत्र्यांशी बोललो, त्यांनीही तत्काळ सकारात्मकता दाखवून निर्णय केला. काल आम्ही भेटलो आणि आज पदरात यश प्राप्त झालं. ह्या कामाच्या मोबदल्यात तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मला एकच शब्द द्या, की सर्व समाजाची प्रामाणिकपणे सेवा करा. महाराष्ट्राला उज्ज्वल भविष्य प्राप्त करून देण्यात तुमच्या फार मोठ्या योगदानाची गरज आहे. ती संधीसुद्धा तुम्हाला चालून आली आहे. या संधीचे सोने करा, जातपातविरहित, सर्व समाजाची सेवा तुम्ही कराल हा विश्वास वाटतो, असे खा. संभाजीराजे यांनी एमपीएससीची नियुक्तिपत्रे मिळालेल्या विद्यार्थ्यांना सांगितले. परंतु, काही मुलींना त्यांच्या हक्काच्या पोस्टिंगपासून वंचित राहावे लागले आहे. उर्वरित मुलांचीही नियुक्तिपत्रे लवकरात लवकर देण्यासाठी मार्ग काढावा. राज्यसेवेच्या १७ मुली यापासून वंचित राहू नयेत, असे खा. संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

आरटीओमध्ये भरती झालेल्या ११८ मुली ज्यांना अतिरिक्त पदांवर नियुक्ती करणार, असे सरकारने जाहीर केलेले आहे. त्या संदर्भातले परिपत्रक तत्काळ काढण्यात यावे. सर्वांसोबत त्यांनाही नियुक्तिपत्र देण्यात यावे. ५४ मुली ज्या पीएसआय भरती झालेल्या होत्या. त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. त्यामधूनही मार्ग काढण्यात यावा. विद्यार्थ्यांनो, काळजी करू नका, मी कायम तुमच्यासोबत ठामपणे उभा असेन, अशी ग्वाही यानिमित्ताने खा संभाजीराजे यांनी दिली.