मुख्यमंत्री औरंगाबादच्या नामांतरावर ठाम, नामांतराचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमाेर ठेवणार

Uddhav Thackeray

मुंबई : ऐतिहासिक औरंगाबाद (Aurangabad) शहराचे ‘संभाजीनगर’ (Sambhaji Nagar) नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेस (Congress) समोरासमोर आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) नामांतरावर ठाम असून, त्यांनी आता थेट मंत्रिमंडळापुढे नामांतराचा प्रस्ताव ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या दोन्ही पक्षांचा याला विरोध असताना असा प्रस्ताव आणला जात असेल तर त्यामागे शिवसेनेची मोठी राजकीय खेळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराला तीव्र विरोध दर्शवला आहे. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात याचा समावेश नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे असताना ‘सीएमओ महाराष्ट्र’ या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून ‘संभाजीनगर’ असा उल्लेख वारंवार करण्यात येत आहे. त्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली. ती ‘प्रिंटिंग मिस्टेक’ होती, असा खुलासा माहिती व जनसंपर्क खात्याचे राज्यमंत्री असलम शेख यांनी केला. मात्र स्वत: मुख्यमंत्री ठाकरे यांनीच गुरुवारी पुन्हा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख करून ट्विट करण्याची सूचना केली. संभाजीनगर असा ट्विटर हँडलमध्ये उल्लेख केला तर त्यात नवीन काय आहे? जे वर्षानुवर्षे बोलतोय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो उल्लेख केला, तेच ट्विटरवर आहे. औरंगजेब काही सेक्युलर नव्हता. शिवसेनेच्या अजेंड्यात सेक्युलर शब्द आहे. त्यात औरंगजेब बसत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला ठणकावले. त्यामुळे त्यांनी ही ठरवून केलेली कृती असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासह सेनेचे नेते कायम औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करत आले आहेत. त्यामुळे जे आम्ही कायम म्हणत आलो त्या भूमिकेत कसा बदल करणार? आम्ही संभाजीनगरच म्हणणार, असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र माहिती खात्याच्या वतीने काढण्यात येणाऱ्या प्रसिद्धिपत्रकांमध्ये ‘औरंगाबाद’ असा उल्लेख करण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनामुळे (Corona) आठ-दहा महिने मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्री ऑनलाइन सहभागी होत होते. मात्र आता वर्षा, सह्याद्री किंवा मंत्रालयातच या बैठका होणार असून त्यासाठी सर्व मंत्र्यांना प्रत्यक्ष हजर राहावे लागेल, असा आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी काढला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामात गती येईल आणि निर्णय घेणे सोपे जाणार आहे. शिवाय व्हर्च्युअल मिटिंग नसल्याने गुप्तताही पाळली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER